Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रवैद्यकीय परीक्षेसंदर्भात ७२ तासांत निर्णय

वैद्यकीय परीक्षेसंदर्भात ७२ तासांत निर्णय

मुंबई

वैद्यकीय परीक्षांसंदर्भात विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील ७२ तासात निर्णय घेऊ, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज स्पष्ट केले.

- Advertisement -

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विविध वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, सिनेट सदस्य आदींशी संवाद साधला त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते. कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण उपस्थित होते. यावेळी वैष्णवी किराड, आशिष मोहोर आदी विद्यार्थी प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या सध्याच्या स्थितीतील अडचणींची माहिती दिली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. अजून हे निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता लक्षात घेता, यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास अडचणी उद्भवणार असतील तर त्या अडचणींचा सकारात्मकपणे विचार करू, यापूर्वीच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून यानंतर पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून योग्य ती भूमिका घेणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

अंतिम वर्षाची परीक्षा होणार

नॅशनल मेडिकल कौन्सिलने अंतिम वर्ष वैद्यकीय शाखेच्या परीक्षा वेळेवरच घेण्याच्या सूचना सर्वच राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार त्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन होईल, मात्र दुसऱ्या, तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या मागणीसंदर्भात अडचणी पाहून राज्यपाल, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भातील पुढील ७२ तासात निर्णय घेणार आहे.

वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांचा विस्तार करा

कोरोना 19 विषाणूच्या प्रादुर्भावाची दुसरी लाट पाहता वैद्यकीय महाविद्यालयाची जी रुग्णालये पूर्णपणे रुग्णांनी व्यापली गेली असतील त्या ठिकाणी संलग्न अशी कोविड केअर सेंटर्स सुरू करण्याची आवश्यकता आहे. रुग्ण व्यवस्थापन करणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न व्हावेत. सौम्य आणि कमी लक्षणे असतील अशा रुग्णांवर उपचारासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

ऑक्सिजनच्या पुरवठ्यात सुलभता आणा

सध्या ऑक्सिजनचे 100 टक्के उत्पादन हे फक्त वैद्यकीय कारणासाठीच आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने वाहतूकीचे योग्य नियोजन केल्यास ऑक्सिजन पुरवठ्यात सुलभता निर्माण होणार आहे, त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी दिल्या. व्हेंटिलेटरची वाढती मागणी लक्षात घेता केंद्राकडे राज्य शासन मागणी करीत आहे, व्हेंटिलेटरची कमतरता भरून काढण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

रुग्णांची लवकर चाचणी करा

मृत अवस्थेत येणारे कोविड रूग्ण आणि रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी विहित केलेल्या आदर्श कार्यपद्धती (एसओपी) चे पालन करण्याची आवश्यकता आहे. संसर्ग झाल्यानंतर रुग्ण उशिराने 8 दिवसानंतर रुग्णालयात दाखल झाला तर नंतर तो दगावतो, त्यासाठी अगोदरच चाचणी करण्याची आवश्यकता असून त्यासाठी ट्रेसिंगवर लक्ष देण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिल्या.

भरती करण्याचे निर्देश

कोविडचे रुग्ण वाढत आहेत त्याचा रुग्णालयांवर ताण वाढत असून मनुष्यबळाची कमतरता पाहता हा ताण भरून काढण्यासाठी कोविडकाळात रिक्तपदे बाह्य स्त्रोताद्वारे भरती करण्यात येत्णार असून तशा जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. वैद्यकीय सेवेतून अलिकडेच निवृत्त झालेले डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ यांना तीन महिन्यासाठी कोविड काळात नेमणूक करता येणे शक्य असून त्यासर्व बाबी तपासून कार्यवाही करा, त्यामुळे आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

आयुर्वेद महाविद्यालयांचा वापर करा

आयुष संचालनालयाच्या शासकीय व अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांनी कोविडच्या या लढ्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. या महाविद्यालयांचा उपयोग जिल्हा प्रशासनाने करून घेण्यासाठी तेथील सुविधांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्याच्या सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या