आरोग्य विज्ञान विद्यापीठ दीक्षांत समारंभ : १० हजार ६८ डॉक्टर्सना पदवी प्रदान, ९८ सुवर्णपदक तर ३९ विद्यार्थ्यांना पीएचडी

jalgaon-digital
7 Min Read

नाशिक |प्रतिनिधी Nashik

आरोग्य विद्यापीठाने देशात आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ऑनलाईन एकविसावा दीक्षान्त समारंभ पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते….

ऑनलाईन पध्दतीने पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच सन्माननीय अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक तथा केंद्र सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव प्रा.डॉ. बलराम भार्गव उपस्थित होते.

याप्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प् मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी याप्रसंगी म्हणाले, कोविड-19 च्या काळात आरोग्य विद्यापीठाने उल्लेखनीय काम केले याबद्दल मला अभिमान आहे. या परिस्थितीत ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्ष परीक्षा घेऊन विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर आदर्श निर्माण केला आहे. आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो. विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र असावे. आरोग्य क्षेत्रात नवनवीन संकल्पना पुढे असून याबाबत समतोल राखण्याकरीता समाजाच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रगती साध्य करावी. तसेच समाजाच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने सर्व विद्याशाखांनी एकत्र येऊन भरीव कार्य करणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विद्यापीठाने विविध सामाजिक व संशोधानात्मक उपक्रमांना प्राधान्य द्यावे. नवीन कीर्तीमान भारत घडविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील कला आत्मसात कराव्यात जेणेकरुन भावी डॉक्टरांचे व्यक्तीमत्व अधिक चांगले होईल. विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्र देव भव’ उक्तीप्रमाणे कार्य करावे. प्रत्येक रुग्णांची सेवा ही राष्ट्राची सेवा आहे अश्या भावनेने काम केल्यास खरी समाजसेवा होईल असे, त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी याप्रसंगी सांगितले की, विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचा लवकरच प्रारंभ होणार आहे. आरोग्य शिक्षण व संशोधनासाठी आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. आरोग्य शिक्षणातील सर्व विद्याशाखांचा समावेश असलेल्या ‘इंटीग्रेटेड मेडिकल कॉम्प्लेक्स’ चा समावेश यात करण्यात यावा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व पुढील वर्षी विद्यापीठ स्थापनेचा रौप्य महोत्सव हा विलक्षण योग असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या रशिया व युक्रेन या देशांतील युध्दामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सहाय्य करण्यासाठी राज्य शासन व पंतप्रधान यांच्याशी राज्यपाल महोदयांमार्फत चर्चा करण्यात येईल. यासंदर्भात विद्यापीठाने पुढाकार घ्यावा व परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी संशोधनपर अहवाल सादर करावा. विद्यापीठाने कुलगुरु यांच्या निर्देशानुसार ‘व्हिजन डॉक्युमेंट’ उपक्रम अंतर्गत कार्य करावे. ज्ञान हे बदलासाठी शक्तीशाली साधन आहे. समाजाच्या विकास व कल्याणासाठी ज्ञानाची निर्मिती व उपयोजन महत्वपूर्ण आहे. राष्ट्र बांधणीच्या प्रक्रियेत आरोग्य क्षेत्राचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉक्टर हा समाज व्यवस्थेचा आदरणीय घटक आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात डॉक्टरांचे कार्य उल्लेखनीय आहे. प्रत्येकाच्या जीवनात किंबहुना प्रत्येक रुग्णांच्या वैयक्तिक प्रसंगात डॉक्टर सहभागी असतात. समाजाचा आनंद व कल्याण जोपासण्याचे सेवाभावी कर्तव्य सर्वांनी करावे असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक प्रा. डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, सामाजिक शास्त्रांसमवेत विज्ञान व तंत्रज्ञान जोडून त्यांचे एकत्रित संशोधन होणे सद्यस्थितीत गरजेचे आहे. यामुळे तंत्रज्ञानातील बदलांचा समाजाला उपयोग होऊ शकतो. स्वदेशी विकास आणि संक्रमणातील विकास या विकासाच्या नव्या वाटा आहेत, याकडे नव्या पिढीने अधिक लक्ष द्यायला हवे. विद्यार्थ्यानी करमणूकीत फारसे न गुंतता संशोधनावर लक्ष द्यायलाच हवे. भारतातील तरुणांनी विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होऊन काम करायला हवे. प्रत्येक विद्यार्थ्याने पर्यावरण रक्षणासाठी जागृत होऊन कार्य करायला हवे. जागतिक आरोग्य क्षेत्रात औषधांपासून ते कुशल आरोग्य सेवा देणारे मनुष्यबळ पुरविण्यात आपलाच वाटा मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विद्यापीठ अहवाल सादर करतांना विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, कोविड-19 साथीच्या काळात विद्यापीठाकडून सर्व उन्हाळी आणि हिवाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. ऑफलाइन परीक्षा यशस्वीपणे घेणारे आरोग्य विज्ञान हे एकमेव विद्यापीठ आहे.

प्रत्येक परीक्षा केंद्राला कोविड खबरदारी वाढवण्यासाठी विद्यापीठाकडून आर्थिक सहाय्य देण्यात आले आणि कोविड सुरक्षा कवच ही आर्थिक योजना संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यापीठ अधिकारी व कर्मचाÚयांसाठी लागू करण्यात आली. नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यापीठातर्फे आंतरविद्यापीठ स्पर्धा आणि एथलाटिक क्रीडास्पर्धेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येते.

त्या पुढे म्हणाल्या की, विद्यापीठाने सिव्हिल हॉस्पिटल नाशिकसह नवीन पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी सज्ज आहे. यामुळे आरोग्य शिक्षण क्षेत्रात संशोधनाची व्याप्ती वाढेल. विद्यापीठाने मालेगाव येथे कोविड संशोधनासाठी ‘मालेगाव मॅजीक’ उपक्रमाअंतर्गत सर्व विद्याशाखांचा सहभाग घेऊन आणि सहकार्याने संशोधन प्रकल्प हाती आहे. या संशोधन प्रकल्पाचे काम सध्या दुसऱ्या टप्प्यात सुरु आहे.

विद्यापीठात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत ओत. ग्रीन कॅम्पस उपक्रमाअंतर्ग विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण व जलसंधारण आदी कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. विद्यार्थी-केंद्रित आणि गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित करून, सामाजिक बांधिलकी, संशोधन व उच्च दर्जाचे आरोग्य शिक्षण देण्यासाठी विद्यापीठ वाटचाल करीत असल्याचे त्यांनी संागितले.

एकविसाव्या दीक्षांत समारंभाचा विद्यापीठ अधिसभागृहात सकाळी 11.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रारंभ झाला. या समारंभात विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 10,068 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या आहेत. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 98 सुवर्णपदक, एक विद्यार्थ्यांस रोख रक्कम पारितोषिक, संशोधन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 39 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.

आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 513, दंत विद्याशाखा पदवीचे 2041, आयुर्वेद विद्याशाखेचे 1021, युनानी विद्याशाखेचे 70, होमिओपॅथी विद्याशाखेचे 936, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग 1744, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे 336, बी.पी.टी.एच. विद्याशाखेचे 150, बी.ओ.टी.एच. विद्याशाखेचे 14, बी.ए.एस.एल.पी. विद्याशाखेचे 31, बी.पी.ओ. विद्याशाखेचे 03, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेचे 06 विद्यार्थ्यांाना तसेच पदव्युत्तर विद्याशाखेतील एम.डी.मेडिकल विद्याशाखेचे 2141, पी. जी. दंत 461, पी.जी. आयुर्वेद 93, पी.जी. होमिओपॅथी 53, पी.जी. युनानी 04, पी.जी. डी.एम.एल.टी. 78, पॅरामेडिकल 104, पी.जी. अलाईड (तत्सम) 272 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या समारंभास विद्यापीठ विद्यापीठ विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते तसेच दीक्षांत समारंभाचा ऑनलाईन कार्यक्रम विविध प्राधिकरण सदस्य, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठया संख्येने ऑनलाईन उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *