ST महामंडळ आगार तारण ठेवून घेणार २ हजार कोटींचे कर्ज

राज्य परिवहन महामंडळ बसचे प्रातिनिधिक छायाचित्र
राज्य परिवहन महामंडळ बसचे प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईः

ST कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन, अन्य खर्च भागवण्यासाठी ST महामंडळाने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी STचे काही आगार, बस स्थानके तारण ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने आता मोठे कर्ज घेण्याचा निर्णय घेणार आहे. महामंडळाची मुंबईसह मोठ्या शहरातील आगार आणि एसटीची मालमत्ता हजारो कोटींच्या घरात आहे. ही मालमत्ता तारण ठेवण्यात येणार आहे. त्या बदल्यात २ हजार कोटींचं कर्ज घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कर्जासाठी २० कोटी रुपयांचा मासिक व्याज एसटीला द्यावा लागणार आहे.

महामंडळासमोर आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारचा निधी किंवा बँकेचे कर्ज घेणे हेच एकमेव पर्याय आहेत. परंतु राज्य सरकार निधी देण्याच्या परिस्थित नाही म्हणूनच बँकेचे कर्ज काढण्याचा विचार होत असल्याची माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. कर्जासाठी राज्य शासनाने हमी घ्यावी, हा पर्याय पण निवडला जाणार आहे. राज्य सरकारकडून याआधीही एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला होता.

३,५०० कोटींचे उत्पन्न बुडाले

लॉकडाऊनच्या काळात उत्पन्न बंद झाल्यानं एसटीची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासह दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे. दिवसाला ६० ते ६५ लाख प्रवासी आणि २२ कोटी रुपये असलेली प्रवासी संख्या १० लाखांवर, तर उत्पन्न पाच ते सहा कोटींवर आले आहे. आतापर्यंत महामंडळाचे ३,५०० कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com