Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमोठा निर्णय : MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

मोठा निर्णय : MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई:

महाराष्ट्रावर आलेले कोरोनाचे संकट आता आणखी गडद होत चालले आहे. यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

MPSC ची परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ११ एप्रिलला होणार होती. परंतु राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णंसख्येची धास्ती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी घेतली. यामुळे परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा घ्यावी म्हणून गेल्या महिन्यात रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

परिस्थिती पाहून नव्या तारखा

राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच परीक्षा फॉर्म भरतांनाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाचीही अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह आयोगाचे प्रभारी सचिव संघ तवरेज आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत उपस्थितांना राज्यातील कोरोना स्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यसचिवांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या