नाशिक । प्रतिनिधी

शहरातील टोळ्यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शहर पोलीसांनी मागील दोन वर्षात 21 सराईतांवर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए़़) कायद्यातंर्गत कारवाई केली आहे. तर नवे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी पुन्हा एमपीडीएचे शस्त्र उगारले असून गुंडामध्ये धडकी भरली आहे.

शहर पोलीसांनी केलेल्या एमपीडीएच्या कारवाईत या वर्षात नऊ गुंडावर तर, मागील वर्षी 12 जणांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे या वर्षी उच्च न्यायालयाने पोलिसांच्या सर्व प्रस्तावांना मंजुरी दिली असल्याने गुंडाना सुटकेचे मार्ग बंद झाले आहेत.

तडीपारीची कारवाई होऊनही वर्तनात सुधारणा न करणार्या सराईत गुन्हेगारांना यापुढे थेट एमपीडीएची कारवाई होणार आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड या कायद्यातंर्गत काही प्रस्ताव सध्या प्रलंबीत असून, लवकरच आणखी सराईत गुन्हेगार कारागृहात बंद होतील, असा विश्वास पोलिस आयुक्तांनी व्यक्त केला.

एमपीडीए प्रस्ताव पोलिस ठाण्याकडून तयार करण्यात येतो. त्यावर पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त पडताळणी करतात. पुढे या प्रस्ताव पोलिस आयुक्त मंजूरी देतात. यानंतर उच्च न्यायालयाची मंजुरी घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला अटक करण्यात येते. या वर्षी अशा पद्धतीने 9 संशयितांना कारागृहात बंद करण्यात आले. गत वर्षी हा आकडा 12 इतका होता.

वर्तनात सुधारणा न झाल्यास एमपीडीए

शहरातील गुंड टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी आणखी काही प्रस्तावावर सध्या काम सुरू आहे. प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये तडीपारीची कारवाई सातत्याने केली जाते. यापुढे तडीपारीच्या कारवाईनंतरही सराईत गुन्हेगारांच्या वर्तनामध्ये सुधारणा झाल्याचे दिसून न आल्यास त्यांच्याविरोधात एमपीडीएचे अस्त्र उगारण्यात येणार आहे.

दीपक पांडे,पोलिस आयुक्त