2019 मध्ये जिल्ह्यात 17 गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’

2019 मध्ये जिल्ह्यात 17 गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’

सचिन दसपुते

अहमदनगर – 2019 मध्ये जिल्हा पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या ‘एमपीडीए’च्या प्रस्तावावर जिल्हाधिकार्‍यांनी वर्षभरात तब्बल 17 गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ची कारवाई केली आहे. यामध्ये सर्वांधिक 11 वाळूतस्करांचा व सहा धोकादायक व्यक्तींचा समावेश आहे. वर्षभरात मोठ्या प्रमाणात झालेल्या ‘एमपीडीए’ कारवाई मुळे गुन्हेगारीला आळा बसण्यात काही प्रमाणात यश आले आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांकडून सराईत गुन्हेगार, वाळू तस्करांची माहिती संकलन करून प्रस्ताव मागितले होते. जिल्हातील श्रीरामपूर, कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, राहुरी, नेवासा, शिर्डी, लोणी, पारनेर, घारगाव, श्रीगोंदा, नगर तालुका, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याने संघटित गुन्हेगारी करणारे, वाळूतस्कर, धोकादायक व्यक्ती यांची माहिती संकलित करून प्रस्ताव पाठविले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधू यांनी प्रस्तावाची पडताळणी करून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी वर्षभरात 17 गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ची कारवाई केली.

सर्वांधिक 11 वाळूतस्करांवर कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ‘एमपीडीए’ची कारवाई केलेल्या 17 गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ताब्यात घेऊन नाशिक कारागृहात स्थानबद्ध केले आहे. 11 वाळूतस्करांवर ‘एमपीडीए’ची कारवाई झाली. त्यामध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील अजय ऊर्फ अर्जुन गणेश पाटील (रा. गांधीनगर), कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील रविराज जगन्नाथ भारती (रा. कुभांरी), कमलेश दिलीप ढेरे, राहुरी पोलीस ठाणे हद्दीतील दीपक बबन लाटे (रा. राहुरी), नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील अक्षय बाबासाहेब गोर्डे (रा. कुकाणा), शिर्डी पोलीस ठाणे हद्दीतील विकी ऊर्फ मुन्ना महेश शिंदे,

लोणी पोलीस ठाणे हद्दीतील गणेश ऊर्फ सोमनाथ बापुसाहेब हळनोर, पारनेर पोलीस ठाणे हद्दीतील राजू उर्फ राजेंद्र भाऊ गागरे, संतोष राघू शिंदे, श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीतील महेंद्र बाजीराव महारनोर (रा. डोमळवाडी) व घारगाव पोलीस ठाणे हद्दीतील सुदाम ऊर्फ दीपक भास्कर खामकर यांचा समावेश आहे. तर सहा धोकादायक व्यक्तीमध्ये श्रीरामपूर पोलीस ठाणे हद्दीतील प्रशांत साईनाथ लेकुरवाळे (रा. निमगाव खैरी), नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अरुण बाबासाहेब घुगे (रा. केडगाव), भिंगार कॅम्प हद्दीतील समद वहाब खान, बाबा ऊर्फ बाबा अंडा शहेबाज जाफर खान, जैय्यद रशीद सय्यद ऊर्फ टायप्या, मुजीब उर्फ भुर्‍या अजीज खान (चौघे रा. मुकुंदनगर) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यात ‘एमपीडीए’ची कारवाई झाली आहे.

अनेक गुन्हेगार रडारवर
गत वर्षभरात 17 गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ कारवाई करण्यात आली आहे. अजून 20 ते 25 गुन्हेगारांविरोधात कारवाईचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. यामध्ये जिल्हातील वाळूतस्कारांचा मोठ्या प्रामाणात समावेश आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी कोणत्याही क्षणी निर्णय घेऊन कारवाई करू शकतात. तर, जिल्हातील अनेक गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आहेत. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांकडून कारवाईचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक सिंधू यांच्या काळात सर्वाधिक कारवाई
जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जिल्हातील गुन्हेगारांवर यापूर्वी ‘एमपीडीए’ची कारवाई अल्प प्रमाणात केली जात होती. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी नऊ महिन्यांच्या कार्यकाळात सर्वांधिक 17 गुन्हेगारांवर कारवाई केली. ‘एमपीडीए’ची वर्षभरातील व आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. तर, सुमारे 20 ते 25 गुन्हेगारांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. सिंधू यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळूतस्करांसह गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत झाली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com