
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागलमधील घरावर ईडीने (ED)आज पहाटेच्या सुमारास छापेमारी केली. दीड महिन्यांपूर्वी मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा (Raid)टाकल्याने विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील या कारवाई प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे...
यावेळी सुळे म्हणाल्या की, हसन मुश्रीफ यांच्यावर दोन महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई झाली याचं काही आश्चर्य वाटत नाही. अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) प्रकरणात ईडी आणि सीबीआयने १०९ वेळा छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांच्यावर छापेमारी करून ईडी आणि सीबीआयला (CBI) हा विक्रम मोडायचा असावा ही शक्यता नाकारता येत नाही. हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी तिसऱ्यांदा गेली आहे तरीही पहिल्या दोन कारवायांमध्ये काय झालं? त्याची माहिती मिळत नाही हे दुर्दैव आहे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले.
पुढे त्या म्हणाल्या की, ''सातत्याने केंद्र सरकारकडून (Central Goventment) विरोधकांवर यंत्रणा राबवल्या जात आहेत. हे संविधानाच्या बाहेरच्या चौकटीत जाऊन हे सर्व सुरु आहे. दडपशाहीच्या दिशेने प्रवास सुरु आहे का? अशी शंका येऊ लागली आहे. मात्र, आता ही शंका न राहता खरंच त्या दिशेने पाऊल जात असल्याचे दिसून येते असे त्यांनी सांगितले.
तसेच पुढे त्या म्हणाल्या की, मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे घटक आहेत. देशमुख, खडसे, राऊत, नवाबाभाई असतील त्यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय झाला, त्याच पद्धतीने कारवाई होत आहे. देशातील ईडी सीबीआयच्या ९५ टक्के कारवाई या विरोधकांवरील आहेत. संविधानाचा सन्मान न करता केंद्र सरकार काम करत आहे", असे त्यांनी म्हटले.