विधान परिषद निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग

jalgaon-digital
3 Min Read

movements of the political parties for Legislative Council elections

उद्या आमदारांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

येत्या २० जून रोजी होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी ( Legislative Council Elections) शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा सर्वच पक्षांनी आपल्या मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. भाजपने आपल्या आमदारांना ( BJP’s MLA’s )ताज प्रेसिडन्सीमध्ये ठेवण्याची तयारी केल्यापाठोपाठ आज काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनही आमदारांना उद्या, शनिवारी मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यसभेच्या धक्कादायक निकालाने महाविकास आघाडीतील तीनही पक्ष सावध झाले आहेत. तर भाजपने राज्यसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

या निवडणुकीत भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेसचे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप यांच्यात १० व्या जागेसाठी लढत अपेक्षित आहे. या १०व्या जागेसाठीची चुरस पाहता कोणत्याही परिस्थितीत क्रॉस व्होटिंग होऊ द्यायचे नाही असा चंग सर्वच पक्षानी बांधला आहे.

भाजपने आपल्या आमदारांना १८ तारखेपासून पंचतारांकित हॉटेलवर ठेवण्याचे निश्चित केले असले तरी मोर्चेबांधणीसाठी बैठकांवर बैठका सुरू झाल्या आहेत. गुरुवारी दुपारी प्रदेश कार्यालयात भाजपच्या कोअर कमिटीची विविध विषयांवर बैठक झाली तरी त्यातील प्रमुख विषय हा विधान परिषद निवडणूक हाच होता. त्यापाठोपाठ रात्री ९ वाजता दुसरी बैठक फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली.

छोटे पक्ष, अपक्षांचे महत्त्व वाढले

गुप्त मतदानामुळे क्रॉस व्होटिंगची भीती सर्वांनाच आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजेनाईक निंबाळकर यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. याआधी भाई जगताप यांनी ठाकूर यांची भेट घेतली होती. भाजपचे प्रसाद लाड यांनीही अपक्षांबरोबरच इतर पक्षातील आमदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. भाई जगतापांची पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील आमदारांशी संबंध पाहता १०व्या जागेसाठी जगतापांना लढावे लागणार की चंद्रकांत हांडोरेंची लढत प्रसाद लाडांशी होणार याबाबत उत्सुकता आहे.

विधान परिषद निवडणुकीत आघाडीचे कौशल्य दिसेल : अजित पवार

विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. विशेषत: याअगोदरही तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र आले होते. प्रत्येक पक्षाचा उमेदवार निवडून आणणे ही त्या त्या पक्षाची जबाबदारी आहे. निवडणुकीत जो जिंकतो त्याच्याकडे कौशल्य असते असे म्हटले जाते. विधान परिषद निवडणुकीनंतर कोणाकडे कौशल्य आहे हे कळेल. महाविकास आघाडीच्या आमदारांना एकत्र केले जात असून अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्यात येत आहे. या निवडणुकीत आमचे कौशल्य दिसून येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

विधान परिषद जिंकणारच : देवेंद्र फडणवीस

राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीत आमचे पाचही उमेदवार जिंकतील असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आमदार आम्हाला मदत करतील आणि पाचवी जागा आम्ही जिंकू, असे फडणवीस म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *