
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी (Nashik Graduate Constituency )गुरूवारी (दि.5) निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार असून याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत गुरुवार (दि.12) जानेवारीपर्यंत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि.29) 2022 रोजी नाशिकसह राज्यातील दोन पदवीधर व तीन शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या पाचही जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी गुरूवारी (दि.5) अधिसूचना प्रसिद्ध होणार असून त्या क्षणापासून नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक कामाला लागले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 12 जानेवारी आहे. दि. 13 जानेवारीला अर्जांची छाननी तर 16 ला माघारीची मुदत असेल. 30 जानेवारीला सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल.दि.2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. पदवीधरकरिता अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयात होणार आहे.त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.
काँग्रेसचे ठरले; भाजपाचे तळ्यात मळ्यात
राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून विद्यमान आमदार सुधीर तांबे हेच रिंगणात राहणार आहेत. प्रतिस्पर्धी भाजपाचा उमेदवाराचे नाव मात्र अजूनही अंतिम झालेले नाही.मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांमधून इच्छूकांनी सहा महिन्यांपासून निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. मात्र,मुख्य लढत ही कॉग्रेस विरुद्ध भाजपा अशीच रंगणार आहे. कॉग्रेस आ.तांबे यांनाच पुन्हा रिंगणात उतरविणार आहे.विरोधात भाजपा अंतर्गत इच्छूकांची संख्या मोठी आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील हे भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.तर नाशिकमधून डॉ. प्रशांत पाटील, केव्हीएन नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, धुळ्यातून विसपूते हेही या उमेदवारीसाठी इच्छूक आहे. यामुळेच भाजपाने थांबा पहा अशी भूमिका घेतली आहे.
निवडणूक कार्यक्रम
5 जानेवारी : निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी
12 जानेवारी : अर्ज दाखल करायची अंतिम मुदत
13 जानेवारी : दाखल अर्जांची छाननी
16 जानेवारी : माघारीसाठीची मुदत
30 जानेवारी : मतदान सकाळी 8 ते दुपारी 4
2 फेब्रुवारी : मतमोजणी