
मुंबई | Mumbai
जगभरात आज प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाणारा व्हॅलेंटाइन डे (Valentine Day 2023) साजरा करण्यात येत आहे. आजच्या दिवशी काही तरुण आपल्या प्रिय व्यक्तीला प्रेमाच्या भावना व्यक्त करतात. त्यावेळी काहींना समोरच्या व्यक्तीकडून होकार तर काहींना नकार मिळतो.
तसेच आजच्या दिवशी मुलींना (Girls) घराबाहेर पडणे देखील कठीण असते. तर काही रोड रोमियो रस्त्यात मुलींची छेड काढतांना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून अशा रोड रोमियोंच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून पालकांकडून रोड रोमियोंना भीती बसावी म्हणून ठोस पाऊले उचलण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला असून ज्यामध्ये रोमियोगिरी करणाऱ्या तरुणाला मायलेकींनी चोप दिला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील (Mumbai) नालासोपाऱ्यातील (Nalasopara) पूर्व आचोळे रोड डॉन लेन परिसरातील असल्याचे समोर आले आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका तरुणाला तरुणीची छेड काढल्याने मायलेकी मारतांना दिसत आहेत.
तर दुसरीकडे या घटनेची पोलिसांकडे (Police) कुठलीही नोंद नसून या मायलेकी कुठल्या परिसरात राहतात याबद्दल अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मुलींची छेड काढण्याचे प्रमाण वाढल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.