
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
कॅनडातील कुख्यात खलिस्तानी दहशतवादी (Most Wanted Khalistani Terrorist) आणि भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेल्या हरदीप सिंग निज्जरची (Hardeep Singh Nijjar) दोन बंदुकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. कॅनडाच्या (Canada) सरे येथील गुरु नानक सिंग गुरुद्वाराबाहेरच त्यांच्यावर गोळ्या घालण्यात आल्या. निज्जरचा भारत विरोधी कारवाया, दंगली आणि आंदोलनांमध्ये मोठा हात होता. निज्जरचे नाव भारताच्या मोस्ट वाँटेड ४० दहशतवाद्यांच्या यादीत होते.
भारतीय एजन्सीच्या मोस्ट वॉण्टेड यादीत हरदीप सिंह निज्जरचा समावेश होता. भारतातील हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याचे नाव पुढे आले होते, त्यानंतर त्याला वॉण्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आले होते. दरम्यान हरदीप सिंह निज्जरचा गोळीबारात मृत्यू झाला असला तरी ही हत्या कोणी केली हे अद्याप समजू शकलेलं नाही. कॅनडाच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
दरम्यान, एनआयएने (NIA) जालंधरच्या एका हिंदू पुजाऱ्याची हत्या केल्या प्रकरणी त्याच्यावर १० लाख रुपयांचा इनाम घोषित केला होता. पुजाऱ्याची हत्या करण्याचा कट खलिस्तान टायगर फोर्सने रचला होता. तत्पूर्वी निज्जरवर भारतविरोधी दहशतवादी कारवाया करण्यावरून एनआयएने चार्जशीट दाखल केली होती. तो मूळचा पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील राहणारा होता. सध्या भारतीय तपास यंत्रणा कॅनडाच्या तपास यंत्रणाच्या संपर्कात असून त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जात आहे.
गेल्या वर्षभरात हरदीप सिंह निज्जर हा भारतीय तपास यंत्रणांसाठी मोठी डोकेदुखी बनला होता कारण त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कार्यकर्त्यांना परदेशात रसद आणि पैसा पुरवायला सुरुवात केली होती. निज्जरच्या दोन साथीदारांना काही महिन्यांपूर्वी फिलिपाईन्स आणि मलेशियामधून अटक करण्यात आली होती.
भारतात कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, त्याचवेळी परदेशातील भारतीय दूतावासांसमोर शिख फॉर जस्टिस या खलिस्तानी संघटनेच्या दहशतवाद्यांनी परदेशातील भारतीय दूतावासांसमोर निदर्शने केली होती. या प्रकरणी भारत सरकारविरोधात भावना भडकावल्याप्रकरणी एनआयएने गुन्हा नोंदवला होता.