
दिल्ली | Delhi
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे मान्सून अंदमान-निकोबार बेटावर दाखल झाला आहे.
तौक्ते चक्रीवादळाने केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात या पश्चिम किनारपट्टीलगतच्या राज्यांना जोरदार तडाखा दिला. याच दरम्यान मॉन्सूनला अनुकूल असे वातावरण तयार झाले होते. पुढील तीन दिवसात २१ मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर दाखल होईल असं हवामान विभागाने सांगितलं होतं.
हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, मान्सून आज अंदमान भागात दाखल झाला आहे. बंगाल उपसागराच्या काही भागावर, दक्षिण अंदमान समुद्र, उत्तर अंदमान बेटे आणि निकोबार बेटांपर्यंत मजल मारली आहे. काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात सुरु असलेल्या हालचालींमुळे वाऱ्याची गती वाढणार आहे आणि त्याचाच परिणाम मान्सून वर होत असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. पुढील ४८ तास हा परिणाम दिसून येईल, असेही सांगितले जात आहे.
तसेच, १ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. सध्या मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळ, त्यानंतर १० जूनपर्यंत तळकोकणात मान्सून दाखल होवू शकतो.
दरम्यान, केरळमध्ये मान्सून वेळेत दाखल झाल्यानंतर तळकोकणातही मान्सून वेळेत दाखल होवू शकतो. त्यानंतर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनच्या सरी बरसतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.