Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपाऊस दमदार: राज्यभरातील पाणीसाठ्यांमध्ये वाढ

पाऊस दमदार: राज्यभरातील पाणीसाठ्यांमध्ये वाढ

मुंबई :

राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, मुंबई, उपनगर आणि परिसरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. दमदार पावसामुळे राज्यभरातील पाणीसाठ्यांमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. पुणे, नाशिक, जळगाव आणि सातारामधील धरणांमधून पाण्याचा विसर्गही सुरु आहे अशी माहिती जलसंपदा विभागातून मिळाली आहे.

- Advertisement -

गेल्या चोविस तासांत इगतपुरी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने दारणा धरण ९२ टक्के भरले. यानंतर हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दारणा बरोबर भावली धरण देखील भरल्याने भावलीतून ७०० क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. निफाडमधील नांदूरमधमेश्वर धरणाच्या ५ वक्राकार गेटमधून १६ हजार ८६५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने गोदावरी नदी पात्रातून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरु आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात साडेसहा टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातही दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील 64 पैकी 48 प्रकल्पांमध्ये 50.99 टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. विशेषतः मध्यम प्रकल्पात 63.64 टक्के पाणीसाठा झाल्याने शहरी ग्रामीण भागातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. अंबड तालुक्यातील ग्लहाटी प्रकल्पात 84.39 टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात 68.39 टक्के, जालना तालुक्यातील गिरजा प्रकल्पात 29.89 टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील 57 मध्यम प्रकल्पामध्ये 52.59 दलघमी म्हणजे 43.78 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

मुळा-भंडारदरा पाणलोट क्षेत्राला मुसळधार पावसाने झोडपले

पुण्यात खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणात 72.30 टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला धरण क्षेत्रात सध्या पाऊसाचा जोर ओसरला आहे. मुठा नदीत 16 हजार 500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सध्या भिडे पुलाला लागून पाण्याचा प्रवाह सुरु आहे. खबरदारी म्हणून भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिवाय भिडे पूलाला लागून असणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आली. मुठा नदी काठालगत असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर नाशिकमधील दारणा धरणातून 9 हजार 900 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

Hatnur dam हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले

जळगाव जिल्ह्यात भुसावळ हतनूर धरणाचे 24 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हतनूर धरणाचे दरवाजे उघडले. हातनूर धरणातून 75,125 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. साता-यात कोयना धरणात 82.31 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कमी पण सलग पाऊस सुरु आहे. धरणात 20694 क्यूसेकने पाणी आवक सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या