जळगाव अपघात : पंतप्रधान मोदी गहिवरले, ट्वीट करत व्यक्त केला शोक

जळगावात ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदीही हेलावले आहेत. मराठी व इंग्रजीतून ट्वीट करत पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.

या भीषण अपघातात 15 मजुरांचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, यात एकाच कुटुंबातील 11 जणांचा समावेश आहे. यावल जवळील किनगावजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. या ट्रकमध्ये पपई मोठ्या प्रमाणात भरलेली होती. ट्रक उलटल्यामुळे मागे बसलेले मजूर हे पपईच्या ढिगाराखाली सापडले असल्याची माहिती मिळत आहे. सर्व मजूर हे झोपलेले होते, त्यामुळे काही कळण्याच्या आता काळाने त्यांच्यावर झडप घातली.

मोदी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले की, महाराष्ट्रातील जळगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला आहे. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशा शब्दात पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.