Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींची 'मन की बात', म्हणाले...

Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींची 'मन की बात', म्हणाले...

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. मन की बातचा हा ७७ वा कार्यक्रम होता. पंतप्रधानांनी फ्रंटलाईन वर्कर्सचं कौतुक केलं. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स यांनी जीवावर उदार होऊन सर्वांनी काम केलं असं मोदी म्हणाले.

भारतावर करोनाचे भयानक संकट आलेलं असताना देशातील नागरिकांनी धैर्य दाखवलं, गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठ्या महामारी विरोधात संपूर्ण देश पूर्ण ताकतीने लढतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या महामारीमुळे आलेल्या अनेक संकटांना देशाने यशस्वीपणे तोंड दिलंय. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध भागात पुरवल्या जाणाऱ्या ऑक्सिजनबद्दलही चर्चा केली. पंतप्रधानांनी रेल्वे, जहाज आणि विमानातून ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या ऑक्सिजन वॉरियर्ससोबतही संवाद साधला. ते करत असलेल्या देशसेवेबद्दल मोदींनी आदर व्यक्त केला. त्याचबरोबर मोदी यांनी कृषी क्षेत्रानं देशाच्या विकास बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची नोंद घेतली.

'देशभरात ऑक्सिजन टँकर घेऊन जाणाऱ्या ऑक्सिजन वॉरियर्ससोबत संवाद करण्याचं आवाहन मला अनेकांनी नमो अॅपवर केलं. जेव्हा करोनाची दुसरी लाट आली, तेव्हा ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली. खूप मोठं आव्हान होतं. देशाच्या विविध भागात मेडिकल ऑक्सिजन पोहोचवण्याचं आव्हान उभं ठाकलं होतं. ऑक्सिजन टँकर घेऊन जाताना छोटीशी चूक झाली, तर खूप मोठा स्फोट होण्याचा धोका असतो. ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट देशाच्या पूर्वेकडील भागात आहेत. तिथून दुसरीकडे ऑक्सिजन पुरवायचा होता. देशासमोर निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीत मदत केली, ती ऑक्सिजन टँकर चालवणाऱ्या टँकरचालकांनी, एक्स्प्रेस ट्रेन आणि हवाई मालवाहतूक करणाऱ्या हवाई दलाच्या जवानांनी,' असं म्हणत मोदींनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधानांनी देशात मागच्या काही दिवसांत येऊन गेल्या चक्रीवादळांबद्दलही भाष्य केलं. 'अलिकडेच १० दहा दिवसांपूर्वी देशाने दोन चक्रीवादळांना तोंड दिलं. पश्चिम किनारपट्टीवर तौते चक्रीवादळ धडकलं, तर पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळाने तडाखा दिला. देश आणि देशातील जनता पूर्ण ताकदीने या चक्रीवादळाशी लढली आणि त्यात कमीत कमी जीवितहानी होईल याची खबरदारी घेतली. पूर्वीच्या तुलने आता जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येणं शक्य झाल्याचंही दिसत आहे. या चक्रीवादळा प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो,'असं मोदी म्हणाले.

तसेच, करोना संसर्गात ज्यांनी आपल्या जीवलगांना गमावलं आहे त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. आपण सर्व या कठिण परिस्थितीत त्यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहोत. आपण या महामारीचा फटका सहन केला आहे. आव्हान कितीही मोठे असो भारताचा विजय संकल्प काय तेवढाच मोठा असतो. देशाची सामूहिक शक्ती आणि आपल्या सेवाभावाने देशाला प्रत्येक वादळातून बाहेर काढले आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदी सरकारच्या आपल्या सत्तेच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत, तर एकूण कार्यकाळाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. यावर बोलतांना पंतप्रधान म्हणाले, 'या सात वर्षाच्या काळात आपण 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या मंत्रावर देशाचा कारभार केला. देशासाठी प्रत्येक क्षण हा समर्पित भावनेनं काम केलं. या काळात अनेक समस्या आल्या पण प्रत्येक वेळी आम्ही मजबूत झालो. मला या काळात अशा अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या ज्यांच्या गावात गेल्या 70 वर्षात पहिल्यांदाच वीज पोहोचली आहे. अनेक लोकांनी सांगितलं की त्यांच्या गावात पहिल्यांदाच पक्के रस्ते तयार झाले, ती गावं शहरांशी जोडली.'

Related Stories

No stories found.