
औरंगाबाद | Aurangabad
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमधल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ऐतिहासिक मैदानावर मोठ्या दिमाखात सभा पार पडली. राज ठाकरेंनी जवळपास एक तास केलेल्या भाषणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे सरकार यांच्यावर हल्ला चढवला. तसेच राज ठाकरे यांनी या सभेत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. घेऊयात त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे.
शरद पवारांना हिंदू शब्दाची अॅलर्जी
शरद पवारांना हिंदू शब्दाची अॅलर्जी आहे. ते नेहमी फक्त शाहु-फुले आणि आंबेडकरांचा उल्लेख करतात. नक्कीच महाराष्ट्र हा त्यांचा आहेच, परंतू पहिल्यांदा येतात ते आपले छत्रपती महाराज. परंतू शरद पवार शिवाजी महाराजांचं नाव कधीच घेत नाही. त्यांच्या सभांमध्ये शिवाजी महाराजांचे फोटो कधीच दिसत नाहीत. मी इथे कोणत्याही ब्राम्हणांची बाजू घ्यायला आलेलो नाही. परंतू महाराष्ट्रातल्या १८ पगड जातींमध्ये तुम्ही विष कालवलं आहेत. असा आरोप त्यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.
४ तारखेपासून भोंग्यांचा आवाज ऐकणार नाही
महाराष्ट्रात मला कोठेही दंगली घडवायच्या नाही, तशी माझी इच्छाही नाही; पण मशिदीवरील भोंगे ४ मेपर्यंत उतरायलाच हवे. अन्यथा मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा वाजवू विनंती करूनही समजत नसतील तर होऊन जाऊ द्या! लाऊड स्पिकर हा सामाजिक विषय आहे, तो धार्मिक विषय नाही. पण तुम्ही याला धार्मिक वळण देत असाल त आम्हीही त्याचे उत्तर धर्मानेच देऊ असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.