मनसेना अध्यक्ष राज ठाकरे लवकरच नाशिक दौर्‍यावर

पक्षाच्या विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
मनसेना अध्यक्ष राज ठाकरे लवकरच नाशिक दौर्‍यावर

नाशिक । फारुक पठाण Nashik

एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या नाशिक शहर तसेच जिल्ह्याकडे राज ठाकरे यांचे मागील काही काळापासून दुर्लक्ष झाल्यामुळे पक्षातील पदाधिकार्‍यांमध्ये मरगळ आल्याची चर्चा आहे. शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा दिलेला राजीनामा तसेच अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली नाराजी या सर्व पार्श्वभूमीवर पक्षाला ऊर्जा देण्यासाठी तसेच आगामी महापालिका व इतर निवडणुकांच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे मैदानात आले आहेत. लवकरच ते नाशिक दौर्‍यावर येणार आहे.

चालू महिन्याच्या 15 ते 20 तारखेला ठाकरे नाशिक दौरा करणार असल्याचे समजते. ठाकरे नाशिक दौर्‍यावर येत आहेत. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ते पक्षाच्या विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच महापालिका निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचनादेखील करणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

2012 च्या महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी राज ठाकरे यांच्या ब्ल्यू प्रिंटवर विश्वास ठेवत तब्बल 40 नगरसेवक निवडून दिले होते. त्यामुळे 2012 ते 2017 याकाळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर होता. त्याकाळात राज यांनी नाशिकच्या विकासासाठी विशेष लक्ष दिले होते. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन चोखपणे झाले होते, तर राज यांच्या पुढाकाराने बॉटनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क, गोदापार्क, रिंगरोड इत्यादी महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले होते. शहराच्या सुशोभीकरणावर त्यांनी विशेष लक्ष देऊन उड्डाणपुलाच्या खालीदेखील सुशोभीकरण करून घेतले. त्याकाळात राज्य शासनाकडून महापालिकेला अनेक वेळा पूर्णवेळ आयुक्तदेखील मिळाले नव्हते तरीही आम्ही भरपूर विकासकामे केल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येतो.

विकासकामांच्या जोरावर 2017 ची महापालिका निवडणूक आपण पुन्हा जिंकू असे वाटत असताना पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येऊन पक्षातील अनेक मोठे नेते पक्षाला रामराम ठोकून बाहेर पडले. त्याचा फटका बसून अवघे पाच नगरसेवक निवडून आले होते. मात्र आता आगामी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला असून त्यासाठी पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे सतत नाशिक दौरे करत आहेत. तर आता लवकरच राज ठाकरेदेखील दौरा करणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

राज ठाकरे यांच्या दौराच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संघटनात्मक बांधणी तसेच इतर अनेक गोष्टींवर त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे.

पराग शिंत्रे, प्रदेश उपाध्यक्ष, मनसेना

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com