Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामनसेनेचे मिशन महापालिका : एकजुटीने काम करा, स्थानिक नेत्यांना तंबी

मनसेनेचे मिशन महापालिका : एकजुटीने काम करा, स्थानिक नेत्यांना तंबी

नाशिक | फारुक पठाण | Nashik

नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (Maharashtra Navnirman Sena) सत्ता असताना झालेली विकासकामे त्यापूर्वीही कधी झाली नव्हती व त्यानंतर ही झाली नाही, असा एक दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नाशिकमध्ये करून ‘मिशन महापालिकेला’ सुरुवात केली. तर दुसरीकडे स्थानिक नेत्यांनी एकजुटीने काम करण्याची तंबीही दिली. तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) महिन्यातून दोन वेळा नाशिकला येऊन आढावा घेणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकून कार्यकर्त्यांना चांगलेच चार्ज केल्याचे दिसून येत आहे…

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे नाशिकवर (Nashik) विशेष प्रेम आहे हे देखील अनेक वेळा सिद्ध झाले आहे. २०१२ साली नाशिक महापालिकेत (Nashik NMC) पहिल्यांदाच मनसेचा महापौर बसला होता, तर २०१७ पर्यंत महापालिकेची सत्ता मनसेच्या हातात होती. त्या काळात नाशिक शहरात कुंभमेळ्याचे देखील यशस्वी नियोजन झाले होते. मनपात सत्ता असताना राज ठाकरे हे सतत नाशिकला येऊन विकासकामांचा आढावा घ्यायचे. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदा पार्कवर त्यांनी पूर्वीपासून लक्ष दिले आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाकडे पाठपुरावा करून पाथर्डी फाटा येथील नेहरू उद्यानची जागा महापालिकेला हस्तांतरित करून देशाचे जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या सहकार्याने त्याठिकाणी नाशिकच्या सौंदर्यात एक मानाचा तुरा म्हणजेच बोटॅनिकल गार्डनची निर्मिती केली.

त्याचप्रमाणे मुंबई नाका या भागात लहान मुलांना वाहतुकीचे नियम तसेच शिस्त मिळावी, त्या दृष्टीने ट्राफिक चिल्ड्रन पार्क तयार केले. छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा इतिहास जगाला माहित व्हावा व त्यांच्या शौर्याचे दर्शन व्हावे म्हणून गंगापूर रोड भागात भव्य असे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय देखील तयार केले. शहरातील रस्त्यांवर त्यांनी विशेष लक्ष देऊन रिंग रोडचे कामे करून घेतले तर शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलांखाली देखील त्यांनी सुशोभीकरण करण्याची नवीन संकल्पना अंमलात आणली. अशी अनेक विकासकामे त्या काळात झाली. मात्र ती स्थानिक नेत्यांनी जनतेपर्यंत पहिजे तशी पोहोचवली नाही व अंतर्गत गटबाजी झाल्यामुळे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसत चाळीस वरून नगरसेवक संख्या फक्त पाच वर आली.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी नाशिकला दत्तक घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे तब्बल ६६ नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. आता पुन्हा महापालिका निवडणूक होण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे राज ठाकरे यांनी नाशिक महापालिका निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याची झलक नुकतीच त्यांच्या दौऱ्यात दिसून आली. राज ठाकरेंनी तीन दिवसीय नाशिक दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना चांगलेच धाऱ्यावर धरले. तसेच स्थानिक नेत्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करण्याची तंबी देतानाच एकमेकांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप न करण्याचा सूचना देखील त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे शाखा नवे नाका ही नवीन संकल्पना अंमलात आणली तर दुसरीकडे शहरात नव्याने नेमणूक केलेल्या १२२ शाखाप्रमुखांना देखील त्यांनी चार्ज करण्याच्या प्रयत्न केला.

अमित ठाकरेंचे आकर्षण

तीन दिवसीय दौऱ्यात राज ठाकरे यांनी पक्षात नवीन ऊर्जा निर्माण केली असून ही ऊर्जा कायम ठेवण्यासाठी आता पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे हे सतत नाशिक दौरे करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमित ठाकरे नाशिकला येणार आहेत. तर दर पंधरा दिवसांनी ते नाशिकला येऊन आढावा घेणार आहे. अमित ठाकरे हे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन थेट त्यांच्याशी बोलतात, सेल्फी घेणाऱ्यांना ते अडवत नाही. त्यामुळे ते तरुणांचे मोठे आकर्षण ठरले आहे. नाशिक महापालिका निवडणुकीची कमान त्यांच्याकडे गेल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत तरुणांची मोठी गर्दी वाढत असल्याचे चित्र आतापासून निर्माण झाले आहे. तर तिकीट वाटपात देखील तरुणांना चांगली संधी देणार असल्याचे त्यांनी नाशिक दौऱ्यात एकदा बोलतांना सांगितले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या