“कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो...”; महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट

“कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो...”; महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट

मुंबई | Mumbai

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ वर्षी निधन झालं. बंकिंगहम पॅलेसने याबाबत अधिकृतपणे माहिती दिली. त्यांनी स्कॉटलंडमध्ये गुरुवारी (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती खराब झाली होती आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते.

मागील ७० वर्षांपासून त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. १९५२ मध्ये त्या पदावर आल्या होत्या. एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त करत आहे. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, “ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही ७० वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ २ ह्यांच्यामुळे.

ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मार्गारेट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं.

कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण ७० वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ २ ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ २ ह्यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाच असेल.

एलिझाबेथ २ ह्यांच्या स्मृतीस अभिवादन.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com