‘मनरेगा’च्या मजुरीत अवघे दहा रुपये वाढ

‘मनरेगा’च्या मजुरीत अवघे दहा रुपये वाढ

दिवसाला मिळतात आता 248 रुपये; मजुरांमध्ये नाराजी

नाशिक । कुंदन राजपूत

करोना संकटात ग्रामीण भागात अनेकांचे रोजगार गेले असून रोजगार हमीवर काम करुन अनेकांच्या घरांच्या चुली पेटत आहेत. मात्र, रोजगार हमीच्या घामाचा दाम वाढवतांना केंद्र सरकारने चालू वर्षात हात आखडता घेतला असून मजुरीत अवघ्या दहा रुपयांची वाढ केली आहे. सध्या दिवसाला 248 रुपये मजुरी मिळत असून महागाई गगनाला भिडली असताना मजुरीत तुटपुंजी वाढ केल्याने मजुरांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला काम मिळावे व त्यांचा उदरनिर्वाह चालावा यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत 365 दिवसांपैकी शंभर दिवस कामाची हमी दिली जाते. शंभर दिवसानंतर रोजगार व मजुरी देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. केंद्रीय ग्राम विकास मंत्रालय मजुरीचे दर ठरवते.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मजुरीचे दर ठरवले जातात. मागील वर्ष मजुरांसाठी अच्छे दिन घेऊन आले होते. मजुरीच्या दरात 32 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मागील दहा वर्षातील मजुरीत केलेली ही सर्वाधिक वाढ होती. त्यामुळे मजुरीचा दर दिवसाला 206 रुपयांवरुन 238 रुपयांवर पोहचला होता. यंदा देखील मजुरीत घसघशीत वाढ होईल ही अपेक्षा होती. मात्र, फक्त दहा रुपयांनी मजुरी वाढवण्यात आल्याने मजुरांमध्ये नाराजी आहे.

करोना संकटाचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला असून बेरोजगारीत वाढ झाली आहे. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने अकुशल कामगार शहराकडून ग्रामीण भागाची वाट धरत असून रोजगार हमीवर काम करुन पोटाची खळगी भरत आहे. त्यात महागाई गगनाला भिडली असून किराणा वस्तू व खाद्यतेलाचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहे. त्या तुलनेत मजुरीत वाढ झाली नसून दिवसाला घाम गाळून मिळणार्या 248 रुपयात कुटूबांचा उदरनिर्वाह चालवायचा कसा असा प्रश्न अनेक मजुरांना पडला आहे. निदान महागाईकडे बघून तरी रोजगारी वाढवायला पाहिजे होती अशी अपेक्षा मजुरांनी व्यक्त केली आहे.

केंद्रिय ग्रामविकास मंत्रालय मजुरीचे दर ठरवते. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मजुरीत वाढ केली जाते. यंदा मजुरी दहा रुपयांनी वाढविण्यात आली आहे.

नितीनकुमार मुंडावरे, उपजिल्हाधिकारी, रोहयो

मजुरीत वर्षनिहाय झालेली वाढ

वर्ष -मजुरी (रु)

2011- 127

2012 -145

2013 -162

2014 -168

2015 -181

2016 -192

2017 -201

2018 -203

2019 -206

2020 -238

2021 -248

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com