
मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमुळे (Legislative Council Elections) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक पदवीधर मतदारसंघाची (Nashik Graduate Constituency) निवडणूक राज्यात चर्चेची ठरली होती...
नाशिक पदवीधर मतदारसंघातून कॉंग्रेसने डॉ. सुधीर तांबेंना (Dr.Sudhir Tambe) उमेदवारी दिली होती. परंतु, अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल न करता त्यांचे पुत्र सत्यजित तांबेंचा अर्ज भरला. त्यामुळे कॉंग्रेसमधील (Congress) अंर्तगत वाद चव्हाट्यावर आला होता. यानंतर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष नाशिक पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेपासून सत्यजित तांबेंचे मामा व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) दूर राहिले होते. त्यावेळी सत्यजित तांबेंना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारल्याने थोरात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
यानंतर कॉंग्रेसच्या हायकमांडने थोरातांच्या नाराजीची दखल घेत नाराजी दूर केली होती. त्यानंतर अपक्ष म्हणून निवडून आलेले सत्यजित तांबे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु, सत्यजित तांबे यांनी अपक्ष आमदार (MLA) राहणेच पसंत केले. त्यानंतर आता सत्यजित तांबे यांनी एका मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना एक सल्ला दिला आहे.
होळीनिमित्त राहुल गांधींना काय शुभेच्छा द्याल? असं विचारलं असता सत्यजित तांबे म्हणाले की, “राहुल गांधींना होळीच्या शुभेच्छा देताना मी एवढंच सांगेन की, राहुलजींनी आणखी लोकांमध्ये मिसळून काम करायला हवं. भारत जोडो यात्रेतून त्यांनी हे केलंच आहे. पण अजून त्यांनी लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. लोकांमध्ये आलं-गेलं पाहिजे. यामुळे लोकांच्या मनातील कटू भावना दूर झाल्या पाहिजेत.” असे त्यांनी सांगितले.
तसेच पुढे तांबे म्हणाले की, विरोधक असो वा सत्ताधारी असो, एकत्र येऊन त्यांनी या देशासाठी कसं चांगलं काम करता येईल, हे आताच्या पिढीतील लोकांना पाहायचं आहे. भारतीय जनता पार्टीने काय केलं? हे ऐकण्यात आता कुणालाही रस राहिला नाही. आपण काय करणार आहोत? पुढे तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय करणार आहात? हे ऐकण्यात देशातील जनतेला खऱ्या अर्थाने रस आहे. मला असं वाटतं की जुनं ते सगळं सोडून आपण काय करू शकतो, यावर त्यांनी काम करायला हवं, असं मला वाटतं, असा सल्ला सत्यजित तांबेंनी राहुल गांधींना दिला आहे.