
मुंबई | Mumbai
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु झाले असून शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनासाठी विधीमंडळाचे सर्व आमदार मुंबईत हजर झाले असून नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) या देखील आपल्या चिमुकल्यासह अधिवेशनासाठी दाखल झाल्या आहेत. मात्र, यावेळी लहान बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षामध्ये सोयी सुविधा नसल्याने आमदार अहिरे यांनी विधीमंडळातून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली.
यावेळी आमदार अहिरे यांना हिरकणी कक्षाची अवस्था पाहून माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्या म्हणाल्या की, "माझ्या मतदारसंघातील (Constituency) लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी या अधिवेशनात माझ्या लहान मुलाची तब्येत ठीक नसतानाही मी घेऊन आले आहे. लहान मुलांसाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षात कुठेही बाथरूमची सुविधा नाही, सगळीकडे धूळ आहे. नुसती हिरकणी कक्षाची घोषणा करून उपयोग नाही तर त्याठिकाणी सुविधा देखील हव्या. मात्र याठिकाणी स्थापन केलेल्या हिरकणी कक्षात धुळीचे साम्राज्य असून मागील आठवड्यात बाळाला घेऊन मी मुंबईत आले होते. त्यावेळी अधिवेशन काळात हिरकणी कक्ष कार्यरत असावा यासंदर्भात प्रधान सचिवांना सांगितले होते. मात्र आज मी तिथे गेले असता कुठलंतरी ऑफिस मला खाली करुन देण्यात आलं. तसेच तिथे खूप धूळ होती. फाटक्या सोफ्यावर बाळाला घेऊन बसण्याची वेळ माझ्यावर आली. आरोग्याला अपायकारक अशी तिथली परिस्थिती होती. " असे अहिरे यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, "कोट्यवधींच्या निविदा निघत आहेत. पण तुमच्या आमदार भगिनींसाठी काही करावं असं वाटत नाही का? मला विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित राहायचं होतं. पण इथल्या हिरकणी कक्षात बाळाला झोपता येईल अशी व्यवस्था नाही. पाळणा नाही. गेल्या तीन दिवसांपासून बाळाला ताप आहे. मी तरी अधिवेशनाला उपस्थित राहिले. सकाळी त्याला औषध दिलं. पण माझी ही अवस्था असेल तर बाकी महिला भगिंनीसाठी काय अपेक्षा कराव्यात? मुख्यमंत्र्यांना हे सांगण्याची काय गरज आहे? अडीच महिन्यात माझं बाळ दहा वर्षांचं होणार नव्हतं. ३० तारखेला पाच महिन्यांचं होईल. सुविधा मिळणं आवश्यक आहे. तिथे डॉक्टर असेल असं वाटलं होतं. आया वगैरे असतील", असेही अहिरे म्हणाल्या.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी नागपूर येथे पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनावेळी सुद्धा आमदार सरोज अहिरे आपल्या लहान बाळाला घेऊन अधिवेशनासाठी हजर झाल्या होत्या. त्यावेळी नागपुरात त्यांच्यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यासह देशभरात आहिरे यांची चर्चा झाली होती. त्यावेळी अहिरे यांनी आई आणि लोकप्रतिनिधी अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत असल्याचे चित्र पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदार अहिरे यांची भेट घेत त्यांचे कौतुक करत हिरकणी कक्ष सुरू करणार असल्याची घोषणा केली होती.