आमदार खडसेंचा पेनड्राइव्ह बॉम्ब!

देवेंद्र फडणवीसांच्या स्टाईलला जशास तसे उत्तर
आमदार खडसेंचा पेनड्राइव्ह बॉम्ब!

मुंबई । Mumbai

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session of the legislature) विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब (Pen drive bomb in assembly) टाकला. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण (Special Public Prosecutor Pravin Chavan) यांचे स्टिंग ऑपरेशन (Sting operation) या पेन ड्राईव्हमध्ये होते. फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. फडणवीस यांच्यानंतर आता त्यांचे एकेकाळीचे मार्गदर्शक आ. एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) यांनीही विधिमंडळात असाच पेन ड्राईव्ह ((Pen drive) डेटा जमा केला आहे. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातला डेटा या पेन ड्राईव्हमध्ये असल्याचे सांगत खडसेंनी देवेंद्र फडणवीसांच्या स्टाईलला जशास-तसे उत्तर दिले आहे.

रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला झाला त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, पण आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी झालेली नाही. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी ही चौकशी आयपीएस अधिकार्‍याकडे दिली होती, पण पोलिसांनी आरोपींना सहकार्य केले,असे खडसे विधान परिषदेमध्ये म्हणाले.

आरोपींना तडिपारीच्या नोटीस दिल्या होत्या त्या रद्द करण्यात आल्या. मुख्यमंत्री गुंडांना संरक्षण देत असतील तर पोलीस तपास कसा करणार? महिलेवर हल्ला होतो आणि त्याच आरोपींना संरक्षण दिले जाते, यापेक्षा दुर्दैव कोणते? महिलांविषयी वाईट बोलत आहेत हे गुंड, केलेली तक्रार दबाव आणून परत घ्यायला लावली, असे म्हणत खडसे यांनी या विषयाची व्हिडिओ आणि ऑडियो क्लिपचा पेन ड्राईव्ह सभागृहात दिला.

एकनाथराव खडसे यांनी हा पेन ड्राईव्ह दिल्यानंतर विरोधी पक्षाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. अशा गुंडांना मुख्यमंत्री संरक्षण देणार असतील, तर दाद कोणाकडे मागायची. 307 चा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट आहेत. या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. आजच्या आज याविषयी कारवाई झाली पाहिजे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. दरम्यान उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी सरकारने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.

एकनाथराव खडसे यांच्या या आरोपांनंतर सरकारकडून मंत्री शंभुराज देसाई उत्तर द्यायला उभे राहिले, पण शंभुराज देसाई आणि खडसे यांच्यात खडाजंगी झाली. संबंधित पेन ड्राईव्ह आणि क्लिप सभागृहामार्फत द्यावा, योग्य ती कारवाई केली जाईल, असे शंभुराज देसाई म्हणाले.

शंभुराज देसाई यांच्या या उत्तराने एकनाथराव खडसे नाराज झाले. आवश्यकता असल्याच चौकशी करू? चौकशी करू असे बोलत नाहीयेत. हा सभागृहावर अन्याय आहे. आम्ही दिलेले पेन ड्राईव्ह खोटे होते, तर उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले एवढे पेन ड्राईव्हपण खोटे होते का? असा सवाल एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला. तसंच या प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणीही खडसे यांनी केली. यानंतर पेन ड्राईव्हमध्ये काय आहे त्याची तपासणी करून पुढील कारवाईचे आश्वासन देऊ, असे शंभुराज देसाई म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com