... अन् बाळासाहेबांची अटक टळली; भुजबळांनी विधानसभेत सांगितला 'तो' जुना किस्सा

... अन् बाळासाहेबांची अटक टळली; भुजबळांनी विधानसभेत सांगितला 'तो' जुना किस्सा

मुंबई | Mumbai

भाई केशवराव धोंडगे (Bhai Keshavrao Dhondge) म्हणजे अजब रसायनाने भरलेले व्यक्तिमत्त्व आहे असा त्यांचा उल्लेख राजकीय पत्रपंडित करतात ते अगदी सार्थ असे आहे. ते जनसामान्य जनतेच्या हितासाठी व सत्य व न्यायासाठी लढणारे व्यक्तीमत्व असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार छगन भुजबळ (MLA Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले...

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवराव शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्ती निमित्त त्यांच्या संसदीय व सामाजिक कार्यावर भुजबळ यांनी आज विधानसभेत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना भुजबळ म्हणाले की, शेकापचे ज्येष्ठ नेते ज्यांची वादळी कारकीर्द असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी केशवराव धोंडगे यांनी वयाची शंभरी पूर्ण केली आहे. कायम आपला पक्ष शेकाप सोबत निष्ठेने राहणारे नेते डॉ. केशवराव धोंगडे हे परखड भूमिका व आक्रमक भाषेला अभ्यासू व आक्रमक आंदोलनाची जोड देऊन सरकारला सळो की, पळो करून सोडत असत. मन्याड खोऱ्याचा वाघ अशी त्यांची ओळख आहे. डॉ. केशवराव धोंडगे हे नाव जरी ऐकलं कि त्यांची समग्र राजकीय कारकीर्द डोळ्यासमोर उभी राहते असे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच विधानसभेत (Legislative Assembly) केशवराव धोंडगे यांच्याबाबत बोलतांना भुजबळ यांनी एक जुना किस्सा सांगितला. ते म्हणाले की, मी एक गोष्ट सांगतोय, जी कदाचित अनेकांना माहिती नाही. त्यावेळी शीख धर्मियांच्याविरुद्ध बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) एक टिप्पणी केली होती.

त्यामुळे शीख धर्मियांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यावेळी शंकरराव चव्हाण (Shankarao Chavan) हे मुख्यमंत्री होते. ते अतिशय कडक आणि नियमाने चालणारे होते. घाबरणारे नव्हते. त्यांनी निर्णय घेतला की बाळासाहेब ठाकरे यांना अटक (Arrested) करायची."ही गोष्ट कानोकानी आमच्या शिवसेनेच्या गोटामध्ये पोहोचली.

त्यावेळी मनोहर जोशी (Manohar Joshi) नवलकर मला म्हणाले की, 'बाळासाहेबांनी केलेल्या विधानामुळे त्यांना अटक होणार. काहीतरी करायला पाहिजे.' हे शंकरराव चव्हाण यांना कसं सांगायचं आणि मग माझ्या डोक्यात कल्पना आली. त्यानंतर मी केशवराव धोंडगेंना भेटलो.त्यांना सांगितलं. त्याचबरोबर यापूर्वी बाळासाहेबांना अटक झाल्यानंतर मुंबई (Mumbai) कशी तीन दिवस जळत होती. तेही सांगितलं. त्यावर ते म्हणाले काळजी करू नको.

पुढे भुजबळ म्हणाले की, सभागृह सुरू झालं. केशवराव धोंडगे उभे राहिले आणि म्हणाले मला बोलायचं आहे. केशवराव धोंडगे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय, आम्हाला असं कळलंय की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा निर्णय घेतला आहे.

तुम्हाला कल्पना आहे की, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली, तेव्हा तीन दिवस मुंबई जळत होती. तुम्ही असा परत निर्णय घेणार आणि मुंबई-महाराष्ट्राला वेठीस धरू पाहत आहात का? तुम्ही याचा फेरविचार केला पाहिजे. टिप्पणी केली असेल, मीटिंग घ्या, दोन्हीकडील लोकांना बोलवा, पण असा निर्णय घेऊ नका आणि मुंबई, महाराष्ट्राला अडचणीत आणू नका.

केशवरावांच्या भाषणानंतर प्रसंगी कठोर भूमिका घेणाऱ्या शंकरराव चव्हाणांसारख्या नेत्याने आपला निर्णय मागे घेतला आणि त्यावेळी घडणारा प्रसंग टळला. तो प्रसंग माझ्या मनात कोरला गेलाय. आज यानिमित्ताने आठवला", असा किस्सा भुजबळ यांनी सभागृहात सांगितला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com