Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या46 योजनांच्या एकत्रीकरणातून मिशन वात्सल्य

46 योजनांच्या एकत्रीकरणातून मिशन वात्सल्य

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

कोव्हिडच्या (Corona) दुसर्‍या लाटेत पालक किंवा रोजगाराची साधनेच गमावून आयुष्याची खडतर वाट झालेल्यांसाठी ‘मिशन वात्सल्य’ (Mission Vatsalya) ही योजना आशेचा किरण ठरणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थीच्या मदतीसाठी नाशिक जिल्ह्यात तब्बल 46 योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत…

- Advertisement -

या योजनांची माहिती देणारे कार्ड आता प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कार्डमध्ये नमूद असलेल्या विविध योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्याला मिळणार आहे. हे कार्ड संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे. तसेच तहसील कार्यालयातून देखील उपलब्ध होऊ शकणार आहे.

गरजूंना या योजनांची माहिती मिळणे सुलभ व्हावे यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी कार्डची (Card) निर्मिती केली आहे. करोनाच्या (Corona) गेल्या दोन लाटांमध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात जीवित हानी झाली आहे.

यात प्रामुख्याने आई किंवा वडील यापैकी एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 2528 असून यामध्ये 238 जणांच्या आईचा मृत्यू झाला आहे, तर 2290 बालकांच्या पित्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्हयात कोविड 19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेली 52 बालके आहेत. आणि कोविड 19 मुळे मार्च 2020 नंतर विधवा झालेल्या महिलांची (ज्यांना 18 वर्षे खालील मुले आहेत अश्या) संख्या 1351 आहे.

या सर्वांच्या कुटुंबांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी राज्य शासनाने (State Government) मिशन वात्सल्य सुरु केले होते. यामध्ये 25 योजनांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने यामध्ये आणखी 21 योजनांचा अंतर्भाव करत 46 योजनांचे कार्ड तयार केले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे.

मिशन वात्सल्य अंतर्गत गाव पातळीवर वेगवेगळ्या विभागांची पथके स्थापन करण्यात येऊन विधवा महिला आणि अनाथ बालके यांची माहिती संकलित करण्यात आलेली आहे. तालुकास्तरीय समितीसमोर अशा प्रकरणांची माहितीचे विश्लेषण होऊन संबंधित कुटुंबांना शासनाच्या कोणत्या विभागाच्या कोणत्या योजनेमध्ये पात्रता आहे याची पडताळणी करून संबंधित योजनांचा लाभ त्या कुटुंबाला मिळवून देण्याचा उद्देश यामध्ये ठेवण्यात आला आहे.

या योजनांचा लाभ

यात कुटुंब निवृत्तीवेतन योजना, एलआयसी किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभ, संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना, श्रावण बाळ योजना, बालसंगोपन योजना, घरकुल, कौशल्य विकास, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, शुभ मंगल सामुहिक योजना अंत्योदय योजना,

आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या वैयक्तिक लाभाच्या योजना, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या वैयक्तिक लाभाच्या योजना आदींशिवाय अन्य योजना तसेच स्वयंसेवी संस्थामार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम यापैकी ज्या ज्या योजनासाठी संबंधित महिला किंवा बालक पात्र असेल त्या योजनांचे अर्ज भरुन त्यांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहेत. याशिवाय अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व शुल्क यासंबंधीची कामे तसेच महिला व बालकांचा मालमत्ता विषयक हक्क अबाधित राखण्यासाठी मदत पुरवण्यात येणार आहे. याचबरोबर ज्यांच्याकडे शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, बँक खाते, आधार कार्ड, जन्म/ मृत्यू दाखला, जातीचे प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे नसतील ती मिळवून देण्यासाठी सर्व सहाय्य उपलब्ध करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या