मिशन नाशिक मनपा : पश्चिम विभागात पंचरंगी लढती शक्य

jalgaon-digital
4 Min Read

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

नाशिक महानगरपालिकेवर ( NMC Elections ) आपलाच झेंडा फडकविण्यासाठी डझनभर राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विद्यमान सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला ( BJP ) रोखण्यासाठी महाविकास आघाडी ( Mahavikas Aaghadi )सज्ज झाली आहे. दुसरीकडे स्वबळाची भाषा सुरु आहे. महाराष्ट्र निर्माण सेना ( MNS ) , डावे, वंचित, आम आदमी सह अपक्ष चांगली तयारी करत आहेत.मात्र एकूणच राजकीय चित्र पाहिले तर शिवसेना ( Shivsena ) व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तुल्यबळ आढळून येत आहेत.आगामी काळात इतर राजकीय पक्षांंनी काही किमया केली तरच दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ होईल, अन्यथा त्यांंची मरगळ सेना-भाजपच्या पथ्यावर पडेल.

नाशिकचा गड राखण्यासाठी स्थानिक नेत्यांवर मोठी जबाबदारी पडली आहे. शहराचा आत्मा ज्याला म्हणता येईल असा नाशिक पश्चिम विभाग (Nashik West Division )हा सर्वाधिक प्रतिष्ठेचा राहणार आहे. येथे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या भागातून आतापयंर्ंत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती अशा विविध पदांवर नगरसेवकांची वर्णी लागली आहे. अपेक्षित विकास झालेला असला तरी अजून खूप काही करता येण्यासारखे होते व आहे, अशी खंत सतत व्यक्त होत आहे.

या विभागात जुने जाणते दिग्गज म्हणविणारे पक्षाच्या प्रदेश पातळीवर पदाधिकारी असलेले नेतेदेखील यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामुळे येथील लढती पंंचरंंगी होणार असल्याचे चित्र आहे. शहरातील उच्चभ्रू वस्तीचा भाग म्हणून नाशिक पश्चिम विभाग ओळखला जातो. या ठिकाणी हिंदू, दलित, ख्रिश्चन लोकसंख्या अधिक आहे.

सत्तेची चावी कोणाच्या हाती द्यायची हे कसमादे मतदारांच्या मतावर बरेचसे अवलंंबून आहे. गेल्या 20 वर्षात नाशिकचा झपाट्याने विकास झाला, नवनवीन ठिकाणी वस्त्या निर्माण झाल्या, भव्य टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. नव्या वसाहती तयार झाल्या. आता त्यांनाही विकासाची आस लागली आहे. केवळ कॉलेजरोड, गंगापूररोड, त्र्यंंबकरोड परिसर चकचकीत करुन भागणार नाही, हे आता मतदार सांगू लागले आहेत.

पूर्वी येथेे काँग्रेसचे ( Congress Party )प्राबल्य होते. मात्र नंतर भारतीय जनता पक्षाने हा बालेकिल्ला स्वतःकडे खेचला आहे. 2014 पासून भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे व काही अंशी सीमा हिरे येथे आहेत.यामुळे नाशिकमधील स्वारबाबानगरपासून ते रविवार कांरंंजापर्यंत पसरलेल्या या विभागात यंंदा अजय बोरस्ते, हिमगौरी आडके, हेमलता पाटील, समीर कांबळे, सुरेश पाटील, शिवाजी गांगुर्डे, प्रशांत आव्हाड, मधुकर हिंगमिरे, रंजन ठाकरे, मुन्ना हिरे, विक्रांंत मते, स्वाती भामरे यांच्यासह धनंजय बेळे, प्रेरणा बेळे, संजय चव्हाण, आशा चव्हाण, शरद देवरे, शितल देवरे, धनंजय निकाळे, अंकीता वावरे, विनोद येवलेकर, देवदत्त जोशी, पंवन भगूरकर, प्रकाश दीक्षित, निखील पवार, सोनल दगडे, किशोर शिरसाठ, संगीता देसाई, रमेश जाधव, गणेश पवार, पंकज जाधव, संतोष गायकवाड आदी दिग्गजांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भारतीय जनता पक्षाने आमदारासंह बुथ कमिट्यांना हा गड राखण्याची जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्रात सत्ता बदल होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले.त्यामुळे ही महाआघाडी यंदा एकत्र आली तर भाजपला तोंड देताना जड जाईल. मात्र ते एकत्र येण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे महापालिकेत झेंडा फडकवण्यासाठी नियोजन करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद येथेे काहीअंशी दिसेल, मात्र काँग्रेसचे समीर कांबळे व हेमलता पाटील वगळता दुसरे चेहरेच दिसत नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील महापालिका निवडणुकीच्या नियोजनामध्ये मागे नाही. त्याचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह पक्षाचे युवा तसेच महिला आघाडीच्या नेत्या काम करत आहेत.राज ठाकरे यांच्या दौर्‍यानंतर मनसेनेचे चैतन्य दिसू लागेल. इतर पक्ष व अपक्षांना येथे बरीच मशागत करावी लागणार आहे.त्यामुळे शिवसेनेचे धनुष्य यंदा किती चालते याचीच उत्सुकता आहे.

एकच महापौर : 1992 मध्ये नाशिक नगरपालिका ते महापालिका अस्तित्वात आली. प्रकाश मते फक्त येथून महापौर झाले. शोभना आहेर, शोभा छाजेड यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली. स्थायी समिती सभापतीपदी उत्तमराव कांबळे, बाळासाहेब आहेर, सुरेश पाटील, शिवाजी गांगुर्डे, हिमगौरी आडके व बाकी सभापती पदापर्यंत पोचले.आता 2022 ला होत असलेल्या निवडणुकीत कोणाचा झेंडा फडकतो व पश्चिम विभागाला कोणती मानाची पदे मिळतात याची उत्सुकता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *