
नाशिक । प्रतिनिधी Nashik
महापालिकेच्या ‘स्मार्ट स्कूल’ या महत्वाच्या प्रकल्पांतर्गत 69 शाळांचे 656 वर्ग डिजिटलाईज होणार आहेत. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असतानाच मनपा शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यासाठी ‘मिशन अॅडमिशन’ मोहीम राबवली जात आहे.
शिक्षकांच्या पालकांसमवेत बैठका सुरू झालेल्या आहेत. लवकरच ‘शाळा प्रवेश उत्सव’ सुरू होणार आहे. प्रवेश पात्र विद्यार्थी आणि पालक यांना शाळेत बोलावून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांची शाळा प्रवेश प्रक्रियेची तयारी करून घेतली जाणार आहे. सर्व शाळांची पटसंख्या जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रत्येक वर्गात किमान 50 विद्यार्थी असे उद्दिष्ट मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाला देण्यात आले आहे.
मनपाच्या प्राथमिक 88 आणि माध्यमिक 12 अशा एकूण 100 शाळा आहेत. सुमारे 29 हजार पटसंख्या आहे. ही मोहीम यशस्वीपणे राबवून पटसंख्या 50 हजारपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. एकूण 896 शिक्षक असून प्राथमिकचे 838 आणि माध्यमिकचे 58 आहेत. ‘स्मार्ट स्कूल’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे मनपाच्या शाळांना उर्जितावस्था प्राप्त करुन देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मनपा शाळांमधून तळागाळातील आर्थिकदृष्टया दुर्बल तसेच वंचित घटकांतील मुला-मुलींना विनामूल्य शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. हे शिक्षण सर्वार्थाने गरजू मुला-मुलींपर्यंत पोहचवणे अपेक्षित आहे. यासाठी सर्वांनी तातडीने ‘मिशन अॅडमिशन’मोहीम गांभीर्याने हाती घ्यावी, अशी सूचना शिक्षण विभागाने मुख्याध्यापक,शिक्षकांना केली आहे.
सेवाभावी संस्थांची मदत घ्या : धनगर
स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत डिजिटलाईज शिक्षणाच्या सर्व सोयी अंर्तभूत आहेत. शाळांचे बाहेरून सुशोभीकरण करण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी. मनपा शाळा दर्जेदार शिक्षणाची केंद्रे बनावित व शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत, असे आवाहन शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी सर्व शाळांना केले आहे.