
पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर
येथील घोड्यामाळ वडारवाडी मधील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा (minor girl) बेकायदेशिर गर्भपात (Illegal abortion) केल्यानंतर मोठा रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू (death) झाल्याची घटना समोर आली आहे. पोलीस बंदोबस्तात रविवारी रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून अवघ्या काही तासात संशयीत आरोपीला अटक करुन या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पिंपळनेर शहरातील घोडमाळ परिसरात वडारवारी ही वस्ती आहे. याठिकाणी राहणार्या रेणुकाबाई ऊर्फ द्रोपदाबाई रामदास मंजुळकर या महिलेने पिंपळनेर पोलिसात फिर्याद दिली आहे. यात नमूद केल्यानुसार ही महिला आपल्या मुलीसह या वस्तीत राहते. उदनिर्वाहासाठी ही महिला मजुरीसाठी बाहेर गेली असता तिची अल्पवयीन मुलगी हिच्याशी याच परिसरात राहणार्या राज दिपक सिकलकर (वय 20) या तरुणाशी प्रेमाचे सुर जुळले. राज सिकलकर याने तिला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिची आई घरी नसल्याचा गैरफायदा घेवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. यातूनच ती गर्भवती राहिली.
दोन्ही समाजात बदनामी होईल या भितीने राज सिकलकर याने तिचा गर्भपात करण्याचे ठरविले. त्यासाठी रिक्षाने तिला धुळ्यात आणण्यात आले. एका खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात केल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिला बेशुध्द अवस्थेत पुन्हा पिंपळनेरात आणून घरात एकटी सोडून देण्यात आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तिला तिचे मामा शिवराम कासुरकर यांनी व इतरांनी खासगी वाहनाने पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले. याठिकाणी पिडीत तरुणीला तपासून मृत घोषित केले, अशी माहिती पोलीस सुत्राकडूनही मिळाली.
यामुळे शहरात उलट सुलट चर्चा सुरु झाली. मृत पिडीता ही अवघ्या 15 वर्ष सहा महिने व 26 दिवसांची आहे. तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आल्याने तिच्यावर धुळ्यात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा तिचा मृतदेह पिंपळनेरात आणून पोलीस बंदोबस्तात अंतिम संस्कार करण्यात आले.
या घटनेमुळे काहीसा तणाव निर्माण झाल्याचे बघून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे यांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढविला. या घटनेसंदर्भात संशयित आरोपी राज सिकलकर याच्या विरुध्द पिंपळनेर पोलीसात गु.र.नं. 65/2023 भा.द.वि. क्र.376, (1) (छ) सह लैंगिक अधिकारापासून बालकांचे संरक्षण अ.धि.नि. 2012 चे कलम, 4, 5 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी.पी. सोनवणे हे कसून करीत आहेत. राज सिकलकर यास काही तासात अटक करुन आज साक्री न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली आहे. या घटनेत पिडीत अल्पवयीन मुलीवर बेकायदेशिर गर्भपात नेमका कुठे झाला? कोणी हे गंभीर कृत्य केले? हा पोलीस तपासाचा मुख्य भाग बनला आहे.