Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याआता मंत्रालयात प्रवेशासंदर्भात नवी नियमावली; वाचा सविस्तर

आता मंत्रालयात प्रवेशासंदर्भात नवी नियमावली; वाचा सविस्तर

मुंबई | Mumbai

सरकारी कामानिमित्त राज्याच्या कानाकोपर्‍यातून मंत्रालयात येणार्‍यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यातच मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उड्या मारण्याच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रणासाठी गृहविभागाने मंगळवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच मंत्रालयात वारंवार येणार्‍यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासंदर्भात पोलीसांनी एक यादी तयार करून त्याचा सविस्तर अहवाल प्रत्येक महिन्याला सरकारला सादर करण्याची सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

मंत्रालयात विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवर उड्या मारण्याच्या घटनांतही वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून मंत्रालयातील प्रवेशाबाबत गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यात आता मंत्रालयातील कंत्राटी कर्मचार्‍यांच्या प्रवेशाकरिताही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी सीसीटीएनएस यंत्रणा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय मंत्रालयाजवळ सध्या मेट्रो सब वेचे काम सुरू आहे.

यामधून अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे याठिकाणीही सुरक्षातपासणी सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. काही कर्मचारी अनेकवेळा कार्यालयीन वेळेनंतर मंत्रालयात येतात. यासाठी त्यांना यापुढे सचिवांची मान्यता घ्यावी लागणार आहे. दरम्यान, मंत्रालयात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत आहे. त्यामुळे वाहनांना प्रवेश देताना आता संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यात प्रामुख्याने वाहनांसाठी आरएफआयडी टॅगसह एनपीआर कॅमेरा आणि बूम बॅरिअर बसविण्यात येणार आहे.

तसेच मंत्रालयात प्रवेशपत्रिका देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री कार्यालयात एका विशेष कार्यअधिकार्‍याची नेमणूक करण्याची सूचना करण्यात आली आहे. या अधिकार्‍यांनी शिफारस केल्यानंतरच अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, अभ्यागतांच्या आणि वाहनांच्या प्रवेशासाठी यापुढे फोन किंवा तोडीं सूचना स्वीकारण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या