
मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात सध्या चांगलाच पेटला असून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण (Hunger Strike) सुरु केले असून आज (०१ नोव्हेंबर) रोजी त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. या मराठा आरक्षणाची धग राज्यातील अनेक गावांपर्यंत पोहचली असून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे...
तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत असून राज्यातील आमदारांच्या घरांवर दगडफेक, जाळपोळीच्या घटनांबरोबरच त्यांच्या गाड्यांचीही तोडफोड केली जात आहे. आज सकाळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांच्या गाडीची देखील काही मराठा आंदोलकांकडून तोडफोड (Vandalizing) करण्यात आली. मुंबईतील कुलाबा येथील आमदार निवासाजवळ हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी (Police) दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेवर आता मंत्री मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलतांना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, "मी सुरक्षित असून घटना घडली त्यावेळी मी तिथे नव्हतो. ज्यांनी गाड्या फोडल्या त्यांच्या भावना मी समजू शकतो. मी स्वतः गृहखात्याला फोन करुन त्यांच्यावर कारवाई करू नका, असे सांगणार आहे. मात्र मंत्र्यांची घरे जाळणे, गाड्या फोडणे अत्यंत गंभीर आहे. यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे. मराठा समाज हा आमचाच समाज आहे. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहोत", असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
मुश्रीफ पुढे म्हणाले की, "सध्या ठराविक दोन ते तीन व्यक्ती ठरवून आमदार आणि खासदारांना फोन करत आहेत. त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल करत आहेत. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आमच्या सर्व आमदारांची एक दिवसीय अधिवेशनाची मागणी आहे", असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांकडून वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी तीन जणांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना जामीन देखील मिळाला होता. तर सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी आरोपींनी जोरदार घोषणाबाजी केल्याचीही माहिती समोर आली आहे.