
मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) याला अखेर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तामिळनाडू येथून अटक (Arrested) केली आहे. त्यानंतर आज ललित पाटीलला अंधेरी सेशन्स कोर्टात (Court) हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला पाच दिवसांची म्हणजेच सोमवार (दि.२३ ऑक्टोबर) पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. मात्र, ललित पाटीलच्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
ललित पाटीलच्या पोलिसांनी मुसक्या आळल्यानंतर त्याच्या चौकशीतून अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ललितने स्वतः आपण ससून रूग्णालयातून (Sassoon Hospital) पळून गेलो नाही, तर आपल्याला पळवण्यात आल्याचा दावा केला आहे. तर ललित पाटीलच्या अटकेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणात ललितसह मंत्री दादा भुसे व शंभूराज देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. यावर आता मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलतांना मंत्री भुसे म्हणाले की, "गेल्यावेळी अंधारे यांनी ही मागणी केली, यानंतर लाईव्ह चर्चा झाली. त्यानंतर मी म्हणालो होतो. चौकशीसाठीच काय कसल्याही टेस्ट करण्यासाठी मी तयार आहे, मी अशा आरोपांना भिक घालत नाही", असे दादा भुसे यांनी म्हटले. तर ललित पाटीलने म्हटले की, 'मी पळून गेलो नाही तर मला पळवलं गेलं, यामध्ये सहभागी असलेल्या नेत्यांची नावे मी जाहीर करेल', यावर बोलताना भुसे म्हणाले की, "ही सर्व माहिती चौकशीमधून बाहेर येईल. माझी हवी तर चौकशी करा, पण जे कोणी आरोप करत आहे, माझ्यासोबत त्यांची देखील नार्को टेस्ट आणि चौकशी करावी", असेही दादा भुसे म्हणाले आहेत.
पुढे बोलतांना भुसे म्हणाले की, "माझा अशा काही प्रकरणात संबध आला तर माझं पद आणि राजकारण देखील सोडायला मी तयार आहे. केवळ प्रसिध्दी मिळवण्यासाठी आरोप करायचे हे बरोबर नाही. यांच्या बोलवण्यामागे कोण बोलवता धनी आहे त्यांचीही नार्को टेस्ट करावी," असेही दादा भुसे यांनी म्हटले. तर सुषमा अंधारे मोठ्या नेत्या आहेत, मी फार लहान शिवसैनिक आहे. त्याच्यांशी तुलना होऊ शकत नाही, असे देखील दादा भुसे यांनी म्हटले. तसेच मी त्यांना याआधी म्हटले आहे की, कोणत्या यंत्राने माझी चौकशी करा, तरीही त्या प्रसिध्दी मिळवण्यासाठी वारंवार बोलत असाव्या असे भुसेंनी सांगितले.
सुषमा अंधारे नेमक्या काय म्हणाल्या होत्या?
ललित पाटीलला अटक झाली चांगले झाले, पण काही प्रश्नांची उत्तरे येणे अपेक्षित आहे. भाजप या गोष्टीचा श्रेयवाद घेत असेल तर फरार झाली यांची जबाबदारी पण गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी घ्यायला हवी. ललित पाटील नाशिकमध्ये ड्रग्जचा कारखाना कसा उभा करु शकतो. बाकी सगळ्या घडामोडी कशा घडू शकतात असा सवाल अंधारेंनी केला होता. तसेच पक्षभूमिका राष्ट्रप्रथम असेल तर तरुण, आरोग्य आणि भवितव्य याचा विचार करावा. आता या घटनेचा तपास करायला हवा, यामध्ये राजकीय लोक आहेत. मंत्री दादा भुसे, शंभुराज देसाईंची नार्को टेस्ट करा असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले होते.