
मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागांत (दि.२८) रोजी म्हणजेच गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर काही जिल्ह्यांतून पाऊस गायब झाला असून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे अजूनही राज्यातील मुंबई, पुण्यासह अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाचा जोर दिसून येत आहे...
अशातच आता हवामान विभागाने ५ ऑक्टोबरपासून राज्यात हवामान कोरडे (Weather Dry) होण्यास सुरुवात होणार असून मान्सूनचा परतीचा प्रवास (Return Journey) सुरू होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे पावसाचा (Rain) जोर ओसरत जाणार आहे. याआधी हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील (West Maharashtra) काही जिल्हे आणि कोकणात पावसाचा अंदाज वर्तवला होता.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रावरील (Arabian Sea) डिप्रेशन रविवारी दक्षिण कोकणमार्गे दक्षिण मध्य महाराष्ट्रावर आल्याने त्याच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आता मोठ्या पावसाची शक्यता नाही. यामुळे ५ ऑक्टोबरपासून कोकण वगळता राज्यातील इतर भागांत हवामान कोरडे होण्यास सुरुवात होईल. तर राज्यावर (State) असलेल्या बाष्पामुळे पुढील दोन दिवसांत काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राची (Low Pressure Area) तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे ५ ऑक्टोबरपासून राज्यातील हवामान कोरडे होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर याआधी हवामान विभागाने ०१ ऑक्टोंबरच्या अंदाजात सांगितले होते की, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे-घाट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी कमी वेळात जास्त पावसाची शक्यता आहे. तसेच झाडे पडणे, डोंगरावरून दगड माती वाहून येणे, दरड कोसळणे या घटनांची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस कमी होईपर्यंत घाट रस्त्यांनी प्रवास टाळावा, असे म्हटले होते.
दरम्यान, हवामान विभागाने (Meteorological Department) राज्यातून नैऋत्य मान्सून आठवड्याच्या शेवटी माघारी फिरण्यास अनुकूल वातावरण तयार झाल्याचे म्हटले आहे. तसेच मुंबईतून (Mumbai) मान्सून (Monsoon) १० ऑक्टोबरनंतरच माघारी फिरण्यास सुरुवात होईल, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.