
तुर्की आणि सीरिया हे दोन देश विनाशकारी भूकंपामुळे हादरले आहे. या भूकंपांमुळे टर्की आणि सीरियामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली असून अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या घटनेत ४ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हजार नागरीक जखमी झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या विनाशकारी भूकंपानंतर महाराष्ट्रात झालेल्या भूकंपाची आठवण झाल्याशिवया राहत नाही. देशभरातील सर्वात भयानक भूकंपापैकी एक म्हणजे, ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाराष्ट्राच्या लातूरमध्ये झालेला भूकंप. या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्येस ७० किमी अंतरावर होते. रिश्टर स्केलवर ६.०४ तीव्रता मोजला गेलेल्या ह्या भूकंपात अंदाजे ७,९२८ माणसे मृत्युमुखी पडले, १५,८५४ जनावरांचा मृत्यू झाला, तर सुमारे १६,००० लोक जखमी झाले.
५२ गावांतील ३० हजार पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर २ लाख ११ हजार घरांना तडे गेले. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यांना ह्या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला. ह्या दोन तालुक्यांतील एकूण ५२ गावे उद्ध्वस्त झाली. हजारो लोक झोपेतच गाडले गेले. ढिगाऱ्यांत अडकलेले मृतदेह, जखमी लोक, नातेवाईकांना शोधणारे ग्रामस्थ, मदत काम करणारे स्वयंसेवक, कोलमडलेले संसार हे विदारक चित्र जागा समोर होत. पण हाहाकाराची ही विदारकता काळीज पिळवटून टाकणारी होती.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी हे गाव या भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि या भूकंपामुळे एक मोठा खड्डा तयार झाला होता, जो अजूनही अस्तित्वात आहे. या भूकंपाने प्रामुख्याने लातूर आणि उस्मानाबाद जिल्हे प्रभावित झाली होती. या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांची संख्या लक्षात घेता, मृतांची आणि जखमींची संख्या खूप जास्त होती, कारण लातूर हे त्याच्या घनतेसाठी प्रसिद्ध आहे.
अचानक घडलेल्या प्रसंगामुळे या गावातील लोकांनी आपली घरे सोडण्यासाठी एकच धावपळ सुरु केली आणि त्यातच धक्काबुक्कीमध्ये फक्त १० किलोमीटरच्या या परिसरात खूप नुकसान झाले. हेडलाईन्सवर भूकंपाची बातमी येताच काही विदेशी आणि स्थानिक देणगीदारांनी मदत पाठवली, तसेच रेस्क्यू टीमला पाठवले. विदेशी देणगीदारांनी 120 ट्रक भरून तंबू, चादरी, अन्न, वस्त्र आणि वैद्यकीय सुविधा तसेच तात्पुरत्या आश्रयासाठी लागणारे सामान पाठवले.
भारतीय लष्कर, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था यांच्याकडून लगेच बचावकार्य सुरु करण्यात आले. थोड्याच कालावधीमध्ये 46.55 लाख रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात आले, तसेच 299 जणांना गुरे देण्यात आली, जी त्यांनी या भूकंपामध्ये गमावली होती.
हैदराबाद आणि मुंबईमधील काही रेडीओ पत्रकारांनी सर्वप्रथम हि बातमी जगासमोर आणली. ते ताबडतोब लातूरजवळ एक छोटे गाव असलेल्या उमरगा येथे पोहोचले, तिथून ते भूकंपग्रस्त भागामध्ये रस्ता मार्गाने पोहोचले. भूकंपानंतरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापित करण्यात आले होते. असा हा लातूरचा भूकंप महाराष्ट्र किंवा भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवणारा भूकंप होता. भारताला आणि महाराष्ट्राला या संकटामधून बाहेर काढण्यासाठी जागतिक पातळीवरून देखील विविध मदत करण्यात आली होती.
भूकंपादरम्यान काय करावे?
जमिनीवर पडा, मजबूत टेबलाखाली आसरा घ्या. जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरून ठेवा. जर जवळपास टेबल नसेल तर जमिनीवर झोपा, पाय पार्श्वभागावर घ्या, डोके गुडघ्याजवळ घ्या, डोक्याच्या बाजू कोपरांनी झाकून घ्या आणि हात माने भोवती घ्या. तुम्ही एखाद्या जागेच्या आतमध्ये धक्के बसणे बंद होईपर्यंत आतच राहा. भूकंपाचा धक्क्यावेळी बेडरूममध्ये असाल तर उशीच्या सहाय्याने डोके वाचवा.
भूकंपानंतर काय करावे?
रेडिओ/टि.व्ही. वरून मिळणार्या आपत्तीविषयक सूचनांचे पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका व पसरवू नका. जुन्या इमारती, नुकसान झालेल्या इमारतीजवळ जाऊ नका व विजेच्या तारा, दगडी भिंतीपासून दूर रहा. पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरू असल्यास बंद ठेवा. बांधकाम तज्ञांकडून इमारतीची तपासणी करून ती किती कमजोर झाली याची माहिती घ्या. जर काही व्यक्ती जमिनीत गाडल्या गेले असतील तर घटनास्थळी थांबा व त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करा.