
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळावी, कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ करावे, वनजमिनीचे पट्टे नावावर करावेत आदी मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्च्याच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज, बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य होण्याची शक्यता आहे.
भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून मुंबईच्या दिशेने शेतकऱ्यांचा लाँगमार्च निघाला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत या मोर्च्याकडे लक्ष वेधत सरकारने शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करावी अशी मागणी केली. त्यावर माकपचे आमदार विनोद निकाले यांनी शेतकऱ्यांसोबत बोलावलेली काल मंगळवारची बैठक रद्द केल्याची माहिती सभागृहाला दिली.
उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संबंधित मंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. या मोर्चाला मुंबईत यावे लागणार नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आहे त्या जागेवरच मोर्चा स्थगित करण्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांनी दिले असल्याची माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.
तत्पूर्वी, आंदोलक शेतकरी दिंडोरीहून रखरखत्या उन्हातून चालत मुंबईच्या वेशीवर आले आहेत. त्यांच्याबरोबरची मुख्यमंत्र्यांची बैठक रद्द करण्यात आली आहे. तरी सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी अजित पवार यांनी केली.