
मुंबई | Mumbai
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवास्थानी बैठक पार पडली. कर्नाटक निवडणूक आणि सत्तासंघर्षावरील निकालावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली...
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी म्हणून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवण्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे एकमत झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेला ठाम पर्याय सक्षमपणे देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल. महाविकास आघाडी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून मोठ्या अधिक ताकदीने पुढील काळात काम करेन,” अशी माहिती पाटील यांनी दिली.
पुढे ते म्हणाले की, “महाविकास आघाडी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील निकालाची तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी चर्चा केली. उन्हाळा असल्याने महाविकास आघाडीच्या सभा थोड्याशा प्रलंबित ठेवल्या आहेत. पावसाचे वातावरण पाहून सभा सुरु करणार आहोत. तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि आमच्या आघाडीतील अन्य पक्षांशी चर्चा करून लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जागांबाबत निर्णय घेणार आहोत,” असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, दिल्लीचे झूट आणि कर्नाटकाची लूट याची देशाच्या जनतेला ओळख झाली आहे. कर्नाटकच्या जनतेमध्ये भाजपाविरोधात मोदी, शहांविरोधात राग होता, तो निघाला. महाराष्ट्रातही भ्रष्टाचारी सरकार आहे. कर्नाटकात जो कोणी मुख्यमंत्री निवडला जाईल त्यांचा पुण्यातील वज्रमुठ सभेत सत्कार केला जाणार, असल्याचे नाना पटोलेंनी जाहीर केले. तसेच कर्नाटकात ४० टक्के कमिशन सरकार म्हणूम भाजप चर्चेत होते. तर महाराष्ट्रात खोके सरकार आहे, असे देखील नाना पटोले म्हणाले.
तसेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, मविआत कोणतेही मतभेद नाहीत. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे नव्हे तर देशातील विरोधी पक्ष जिंकला असल्याने महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होणार आहे. महाराष्ट्रातही भाजपचा पराभव होणार आहे. जसं कर्नाटकात जिंकलो...त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे. मविआमध्ये जागा वाटप होणार. त्याची चिंता इतरांनी करू नये, असे राऊत यांनी सांगितले.