‘मी नाशिककर’चा रिंगरोडसाठी पुढाकार

क्रेडाईचे सहकार्य, पाठपुराव्यासाठी समिती
‘मी नाशिककर’चा रिंगरोडसाठी पुढाकार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकमध्ये मोठे उद्योग घेऊन शहरात रोजगाराच्या संधी निर्माण होऊन एकूणच अर्थकारणात सकारात्मक बदल होण्यासाठी विविध व्यावसायिक संघटनांची मोट बांधणारी अराजकीय चळवळ ‘मी नाशिककर’( Me Nashikkar)तर्फे नाशिकमधील विविध रिंग रोडचे (Ring Road )सुयोग्य नियोजन कसे होईल, यावर विचारमंथन करण्यासाठी नुकतीच एक बैठक झाली.

बैठकीला विविध संस्थांचे तसेच शासनाचे अधिकारी उपस्थित होते. ‘मी नाशिककर’चे संस्थापक पियुष सोमाणी, उमेश वानखेडे, मनीष रावल, संजय कोठेकर, तसेच क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, आदिशक्तीच्या डॉ. प्रज्ञा पाटील, नाशिक मनपाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, जितेंद्र पाटोळे, दिलीप चौधरी,नामदेव खेडकर, एन एम आर डी ए चे पी.जी.राऊत व राजेश महाले आदी यावेळी उपस्थित होते.

नाशकात दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा हा फक्त नाशिकचा नसून तो सर्व राज्याचा कुंभमेळा आहे. त्याचे औचित्य साधून शहराच्या शाश्वत आणि दूरदर्शी विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचा सूर बैठकीत निघाला. नाशिक हे देश-विदेशातील धार्मिक महत्त्व असलेले महत्त्वाचे शहर असून महाराष्ट्राचे भक्तीस्थळ म्हणून योग्य रीतीने त्याचे ब्रॅण्डिंग करावे. यासाठी त्रंबक-वणी-शिर्डी असा कॉरीडोर बनवावा, शहराच्या बाहेरून 30 किमी जाणारा रिंगरोड चेन्नई-सुरत तसेच वडपे येथे समृद्धी महामार्गा सोबत जोडावे, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे पाठपुरावा करण्यासाठी व तांत्रिक सहकार्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीचे नेतृत्व क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष उमेश वानखेडे यांच्याकडे आहे. मार्गदर्शक म्हणून क्रेडाई राष्ट्रीयचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर आहेत. उद्योजक पियूष सोमानी व क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन हे तज्ञ म्हणून तर संजय कोठेकर समन्वयक म्हणून काम बघणार आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध संबंधित शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना विनंती करून रिंगरोडसाठी परवानगी तसेच अधिकाधिक निधी कसा मिळेल हे ही समिती बघणार आहे.

या आहेत सूचना

शहरातील आंतरिक रिंगरोड 30 मीटर रुंदीचा व पूर्ण काँक्रिटचा असावा, त्यामुळे शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन होईल. 15 किलोमीटर लांबीचा हा रिंगरोड सध्या 14 मीटरचा डांबरी रस्ता आहे. तोदेखील अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत आहे. शहराच्या बाहेरूनसुद्धा मनपा हद्दीत असणार्‍या प्रस्तावित 35 किलोमीटर रिंग रोडचे योग्य नियोजन व आराखडा तयार होऊन तो लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे. तसेच शहराबाहेरील 65 किलोमीटरचा रिंगरोड हा 60 मीटरचा असावा. त्यासाठी पुणे व हैदराबादच्या धर्तीवर एमएसआरडीसीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्तरावर पाठपुरवठा करावा.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com