
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाताळ (christmas Festival )हा ख्रिस्ती धर्मियांचा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नाताळसाठी शहरातील चर्चसह मुख्य बाजारपेठा सजू लागल्या असून ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी पताका यासह सांंताक्लॉजचे कपडे आणि वस्तू खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे.
शहरातील विविध दुकानांमध्ये नाताळसाठी आवश्यक वस्तूंची रेलचेल दिसत आहे. गेल्या दोन वर्षांच्या करोना संकटानंतर यंदा पहिल्यांदा मोकळ्या निरोगी वातावरणात नाताळ साजरा करण्यासाठी ख्रिश्चन बांधव सज्ज झाले आहेत.
सणाची पर्वणी साधण्यासाठी बाजारपेठेत व्यापारीवर्ग सज्ज झाला आहे. दुकानांमध्ये वस्तूंची आकर्षक मांडणी करत असून महिला व बच्चे कंपनीला आकर्षित करण्याकडे सर्वाधिक कल आहे. होली रिट, बेल्स, प्रभू येशू आणि मेरी यांच्या मूर्ती, सांताक्लॉजचे कपडे, चांंदणी आकाशकंदिल, खेळणी, सांताक्लॉजचा मुखवटा, ख्रिसमस बॉल्स, ट्री आणि टोप्या बाजारात आल्या आहेत. नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी मिठाई, चॉकलेट आणि केकची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असून केक उत्पादक खूश आहेत.
होलीक्रॉस चर्चमध्ये स्नेहसंध्या
रविवारी (दि.25) सायंकाळी 5:30 वाजता भारतीय एकात्मता समिती आणि होलीक्रॉस चर्चतर्फे नाताळ सणानिमित्त सर्वधर्मिय स्नेहमेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सृष्टी संरक्षणात महत्त्वाचे योगदान देणार्या निवडक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. होलीक्रॉस चर्च त्र्यंबकनाका नाशिक येथे होणार्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय एकात्मता समितीचे कार्याध्यक्ष जे. पी. जाधव आणि फादर विजय गोन्सालवीस, पवन जोशी, फ्रान्सिस वाघमारे यांनी केले आहे.