
जालना | Jalana
राज्यातील मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांचा आज आमरण उपोषणाचा ८ वा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने राज्याच्या विविध भागात जोर धरला असून आंदोलकांकडून अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. आंदोलन इतरत्र पसरू नये यासाठी जालना आणि बीड जिल्ह्यात पोलिसांकडून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत गंभीर आरोप लावले आहेत.
जालना आणि बीड जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. इंटरनेट सेवा बंद झाल्यानंतर जिल्ह्यात अफवांचे पेव फुटले आहे. ‘आंदोलनस्थळावरून जरांगे पाटलांना पोलीस जबरदस्तीने उचलून नेणार असल्याच्या अफवा नागरिकांमध्ये पसरू लागल्या आहेत. याबद्दल मनोज जरांगे पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी रोष व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘यात लोकांची काय चुकी आहे. उपमुख्यमंत्री जाणूनबूजून इंटरनेट बंद करत आहेत. बीडमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्यांना मारायला लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावत आहेत. इंटरनेट बंद केल्यानतंर लोकांमध्ये रोष उत्पन्न होणारच आहे. आमच्या माणसासोबत काही दगाफटका करताएत की काय, असं लोकांना वाटतय. दगाफटका करण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा डाव असू शकतो. परंतु मी भीत नाही’ असं जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
भाजप आमदार नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. जरांगे पाटील यांचं स्क्रीप्ट कोण लिहून देतो, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला होता. यावर जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. ‘नितेश राणे यांनी यानंतर काहीही बोलू नये, अशी माझी इच्छा आहे. ते एकीकडे मला फोन करून गोड गोड बोलतात. आणि दुसरीकडे माझी स्क्रीप्ट कुणी लिहिली ते विचारतात. प्रसाद लाड हे प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांना मी माझी स्क्रीप्ट कोण लिहून देतो, हे सांगणार आहे' असं जरांगे पाटील म्हणाले.