
मुंबई | Mumbai
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी दोन दिवसांपूर्वी "मराठा आणि कुणबींमध्ये फरक आहे. जरांगे-पाटील मराठा आणि कुणबी (Maratha and Kunbi) एकच असल्याचे सांगतात. पण, तसं काही नाही. जरांगे-पाटलांनी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करावा. मी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) अभ्यास केला आहे. मात्र, जरांगे-पाटील कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही, असे बोलत आहेत. ९६ कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मीही आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही", असे म्हटले होते. त्यानंतर आता राणेंच्या या विधानावर मनोज जरांगे पाटीलांनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे...
यावेळी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, "कुणबी प्रमाणपत्र घ्यायला अडचण काय आहे? आपण आपल्या आजोबा-पंजोबांच्या रक्ताचे आहोत की नाही? आपला आजोबा- पंजोबा अडाणी होता बिचारा. आता आपण सुशिक्षित झालो, त्यानेच आपल्याला शिकवलं. रात्रंदिवस काबाड कष्ट केले, आपल्याला सुशिक्षित केलं. तो आपला आजोबा, पंजाबो, खापरपंजोबा स्वतःला कुणबी समजायचे. एखादा कोणाकडे मुलगी बघयाला गेले आणि कोणी विचारलं की तुमचा मुलगा काय करतो तर ते म्हणायचे आमचा मुलगा एकटा पंधरा एकर कुणबी करतो. पण नंतर कुणबीला सुधारित शब्द आला शेती", असे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हटले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, "आपला आजा चपलेला पायताण म्हणायचा, पण आता पायताणाला चप्पल म्हणतात मग पायताण घालायची बंद करायची का? पूर्वी हॉटेलला हाटेल म्हणायचे, आता नवीन शब्द आला रेस्टॉरंट, मग चहा प्यायचा बंद करायचा का? पूर्वी घराला वाडा म्हणायचे आता हाऊस म्हणतात मग झोपायचं बंद करायचं का? सुधारित शब्दाला अडचण काय? तुम्हाला घ्यायचं (कुणबी प्रमाणपत्र) तर घ्या नाहीतर घेऊ नका. तुम्हाला जबरदस्ती केली का कोणी? पण गोरगरिबांच्या लेकरांना घेऊ द्या. त्यांच्या आयुष्याची माती करू नका. त्यांना भविष्य घडवायचे आहे. मराठ्यांच्या ते हक्काचे आहे, त्यांना मिळू द्या. तुम्ही आमचे आदर्श लोक आहोत, महाराष्ट्रातील सगळे वरिष्ठ मराठे तुम्ही आदर्श आहात, तुम्ही नका विरोध करू, त्यांचे कल्याण होऊ द्या", असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांची आंतरवाली सराटी येथील ऐतिहासिक सभा (Sabha) पार पडल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राज्यभरात सभा घेण्याचा सिलसिला चालू ठेवला आहे. या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून राज्यभरात मराठा आरक्षणाचे झंझावती वादळ घोंगावत आहे. तसेच विविध वृत्तवाहिन्यांवर मनोज जरांगे पाटलांच्या मुलाखती (interview) प्रचंड गाजत असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.