
जालना | Jalna
जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात (Antarwali Sarati village) मराठा समाजाला आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज जंगी सभा पार पडली. या सभेसाठी राज्यभरातील मराठा बांधव अंतरवाली सराटी गावात दाखल झाले होते. १०० एकरच्या मैदानात जरांगे पाटील यांची ही सभा झाली. यावेळी सभेला संबोधित करतांना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मंत्री भुजबळ यांनी अंतरवाली येथील सभेसाठी सात कोटी खर्च केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आज अंतरवाली सराटी येथील सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला. तसेच यावेळी त्यांनी सभेच्या खर्चाच्या पैशांचा हिशोब देखील दिला...
यावेळी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, "माझा मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध नाही म्हणणारे छगन भुजबळ आता विरोधात बोलत आहेत. ते आता फडफड करत आहेत. सभेला ७ कोटी रुपये खर्च आल्याचे छगन भुजबळ म्हणाले. मात्र सभेसाठी १०० एकर जमीन शेतकऱ्याने फुकट दिली, येऊन विचार", असे मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांना म्हणाले. तसेच "गोधा पट्ट्यातील १२३ गावांतील २२ गावांनी पैसे दिले आहेत. आणखी १०१ गावांकडेही पैसे शिल्लक आहेत. पण, पैसे घेतले नाहीत. कारण, हे आंदोलन पैशांसाठी नाहीतर न्यायासाठी आहे. भुजबळांना जमिनी घेण्याचं वेड लागलं आहे. पैसे जनतेचे खातात. त्यामुळे भुजबळांना वाटलं आपण सभेसाठी जमीन विकत घेतली आहे. आम्ही कोटी हा शब्द पहिल्यांदा ऐकला आहे. आम्ही दुसऱ्यांकडून पैसे घेऊन दुचाकीत पेट्रोल टाकतो. मग सात कोटी रूपये कुठून पाहणार?" असंही जरांगे पाटील यांनी म्हटले.
पुढे बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, "लोक १० रूपयेही देत नाही, असं भुजबळ म्हणतात. तुम्हाला लोक पैसे देत नसतील. गोरगरीब मराठ्यांनी तुम्हाला मोठं केले. त्या लोकांचे रक्त पिऊन पैसे कमवण्याचे काम तुम्ही केलं. म्हणून तुमच्याकडं धाड पडली. गोरगरीब मराठ्यांचे पैसे खाल्ल्यामुळे दोन वर्षे जेलमध्ये बेसन खावं लागलं," अशी टीकाही जरांगे पाटलांनी भुजबळांवर केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी छगन भुजबळांना समज द्यावी. अन्यथा माझ्या नादाला लागल्यावर मी सोडत नाही," अशा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे मराठा कार्यकर्त्यांना संबोधित करतांना दिला.