महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

जालना | Jalana

गेल्या 6 दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये आमरण उपोषणासाठी बसले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत मनोज जरांगे यांनी मागे हटण्यास नकार दिला आहे. मराठा समाजाच्या विनंतीनंतर मनोज जरांगे हे पाण्याचा घोट घेण्यास तयार झाले आहेत. तसेच, दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनानंतर राज्य सरकारकडून जीआर यायला लागले आहेत, पण तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनानंतर मात्र त्यांना बैठकाही घेता येणार नाहीत, तर या आंदोलनाचे 6 टप्पे होणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारला थोडा अवधी द्या, असे आवाहन केले आहे असे मनोज जरांगे यांना विचारताच ते म्हणाले की, थोडा म्हणजे किती? मुख्यमंत्र्यांना तुम्हीच विचारा. किती अवधी द्यायचा? थोडा म्हणजे 40 वर्ष का?, असा प्रश्न जरांगे पाटील यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. तसेच, त्यांनी आमचे शांततेचे आंदोलन पाहिले आहे. आता तर 1 नोव्हेंबरपासून आमच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. तेव्हापासून तर सरकारला बैठका देखील घेण्यात येणार नाहीत, असा इशाराच जरांगे यांच्याकडून देण्यात आला आहे.

आंदोलन भरकटत चालले आहे, जरांगेंनी याबाबत जरा विचार करावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला उत्तर देत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके हे खूप खोडसाळ आहेत. ते काही तरी बोलले असतील म्हणूनच त्यांच्यासोबत असे घडले असेल. त्यांना मराठ्यांनी मोठे केले आहे. ते कधी सोसायटीत देखील निवडून येऊ शकत नाही. पण मराठ्यांनी त्यांना मोठे केले आणि ते मराठ्यांना ज्ञान शिकवत आहेत. पण तिथे जे काही घडले आहे ते मराठ्यांनी केलेले नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो पण सरकारने त्यांच्या वाचाळवीरांना आवरावे, असे देखील मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तसेच, माझा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की तुम्ही मराठा समाजाच्या मागणीबाबत आणि आरक्षणाच्या प्रश्नाबाबत पंतप्रधानांना बोललात का? याचे आजपर्यंत आलेले नाही. याचा अर्थच असा होतो की केंद्र सरकारला तुम्ही काहीही सांगितले नाही. केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय क्युरेटिव्ह पिटिशनची तारीख पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आले होते तरीही त्यांच्याशी संवाद साधला नाही हा प्रश्न सांगितला नाही मग आम्ही विश्वास कसा ठेवायचा? क्युरेटिव्ह पिटिशन 13 ऑक्टोबरलाच दाखल झाली आहे. त्यानंतर 16 तारखेला आपण विचारले होते. पण पंतप्रधानांना काही माहीत असते तर पंतप्रधानांनी शिर्डीत उल्लेख केला असता. आमचे आंदोलन शांतेत सुरू आहे. मात्र हे शांततेचे युद्ध सरकारला परवडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आलेला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com