
नाशिक । विजय गिते | Nashik
जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी (tribal) भागात तीन ते चार दिवसांपासून होत असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे आंबा (mango) पिकाला मोठा फटका बसला आहे. मोहरात असलेल्या आंबा पिकाचे नुकसान झाल्याने या भागातील ७० टक्क्यांवर उत्पादन घटण्याची भीती आंबा उत्पादकांकडून व्यक्त केले जात आहे. हे नुकसान मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी आंबा उत्पादकांकडून होत आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात प्रामुख्याने सुरगाणा (Surgana), पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व नाशिक तालुक्यांच्या विविध गावांमध्ये शेतकऱ्यांनी आंबा लागवडी केली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ४ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड झालेली असून अपेक्षित उत्पादन हे ७७९४ टन असते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे मोहर गळाल्यामुळे आंबा पिकाचे उत्पादन घटणार आहे.
धान्य व भाजीपाला (Grains and vegetables) पिकास योग्य तो भाव मिळत नसल्यामुळे गेल्या चार-पाच वर्षांपासून आदिवासी पाड्यावरील शेतकरी आंबा पिकाकडे वळले असून या पिकाकडे नगदी पीक (cash crop) म्हणून पाहत आहेत. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत आंब्याची मागणी वाढल्याने उत्पन्नही वाढले आहे.
मात्र, चालू वर्षी पावसामुळे उत्पादनाचे गणित बिघडले आहे. फळ लागून वाढीच्या अवस्थेत असतानाच अनेक भागांत मोहर झडून पडला असून लहान कैऱ्या वाऱ्यामुळे पडल्या आहेत. पावसाने बुरशीजन्य रोगांच्या विळख्यात आंबा सापडला आहे. त्यामुळे केवळ २० ते २५ टक्के उत्पादन हाती येईल, अशी परिस्थिती असून ७० टक्क्यांवर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अर्थकारणावर होणार परिणाम
या भागातील आंब्याची चव व गुणवत्ता ही चांगली असते त्यामुळे येथील आंब्याना मोठी मागणी असते. यामुळे मागील वर्षी आदिवासी पाड्यावरील आंब्याची निर्यात झाली होती. आंब्याला मागणी असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारणही सुधारले आहे. मात्र, यंदा पावसाने फटका दिल्याने उत्पादनासह शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. त्यामुळे या भागातील आंबा उत्पादक शेतकरी (farmer) हवालदिल झाला आहे.
"सलग तीन दिवसांपासून पाऊस व वादळी वाऱ्यामुळे आंबा मोहर गळून पडला आहे. मोहरावर पावसाचे पाणी सतत पडत असल्यामुळे मोहर जळून गेला आहे. ज्या कैऱ्या सुपारी एवढ्या झाल्या होत्या त्याही गळून पडल्या आहेत. परिणामी आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाकडून मदत मिळावी."
यशवंत गावंडे, आंबा उत्पादक, गावंधपाडा, ता. पेठ
"वातावरणामुळे आंब्याचा पहिल्या पाठोपाठ दुसराही मोहर गळून गेला आहे. आपल्या आंब्याच्या वाडीत 5400 झाडे आहेत. त्यापैकी दीड ते पावणे दोन हजार झाडे आपण मोहरासाठी धरली होती. मात्र, वातावरणामुळे मोहर काळा पडला असून आता त्यावर औषध मारूनही फायदा होणार नाही. या वातावरणामुळे कैऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर काळे डागही पडले आहेत. याचा फटका आता उत्पादनावर बसणार आहे."
महेश टोपले,आंबा उत्पादक,मोहपाडा, ता.पेठ