मालेगाव : लहान मूर्ती निर्मितीला प्राधान्य

चिनी सजावट साहित्यावर मुर्तीकारांचा बहिष्कार
मालेगाव : लहान मूर्ती निर्मितीला प्राधान्य

मालेगाव । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होण्याचे संकेत यापुर्वीच मिळाले असतांना आता शासनाच्या गृहविभागाने गणेशमुर्तींच्या उंचीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे मोठ्या मुर्तींच्या अत्यल्प मिळालेल्या ऑर्डर्सही रद्द झाल्याने मुर्तीकारांना लाखोंचा फटका बसणार आहे. याशिवाय मुर्तींच्या सजावटीसाठी वापरण्यात येणार्‍या चिनी साहित्याच्या बहिष्कारामुळे देशी व स्थानिक सजावटीचे साहित्य महागड्या दराने घ्यावे लागत असल्याने नुकसानीत आणखी भर पडणार असल्याची खंत येथील प्रसिध्द मुर्तीकार रामदास बोरसे यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केली आहे.

मालेगावला गणेशोत्सवाची मोठी परंपरा असून येथील श्री विसर्जन मिरवणुका संपुर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणार्‍या ठरतात. शहर-परिसरात ५०० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे असून १०० हून अधिक मंडळे ५ ते २० फूट उंचीच्या गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करतात. त्यासाठी उत्सवाच्या चार महिने आधी विविध मंडळे आपल्या संकल्पानुसार श्रीमुर्ती तयार करण्याच्या ऑर्डर्स नोंदवितात. शहरात ६ प्रमुख मुर्तीकार आहेत.

येत्या २२ ऑगस्टपासून गणेशोत्सवास प्रारंभ होणार असून यंदाच्या गणेशोत्सवावर मात्र करोनाचे सावट असल्याने आपल्याकडे सार्वजनिक मंडळांकडून 12 ते 14 फूट उंचीच्या 5 ते 6 ऑर्डर्स नोंदविण्यात आल्या होत्या. यामुर्तींचे निर्माणकार्य 50 टक्के झाले असतांनाच शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना जास्तीतजास्त ४ फूट उंच मुर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे मिळालेल्या ऑर्डर्स देखील रद्द झाल्याने मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. शासनाच्या निर्बंधानुसार आता मंडळांसाठी ४ फूटाच्या आतील मुर्तींचे निर्माण केले जात आहे. याशिवाय घरगुती प्रतिष्ठापनेसाठी १०१ ते ५०१ रूपये दरम्यान विक्री होणार्‍या श्रीमुर्तीच तयार केल्या जात असल्याचे मुर्तीकार बोरसे यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी गणेशमुर्ती निर्माणाचे काम साधारणत: जानेवारी महिन्यापासून सुरू केले जाते. त्यासाठी संपुर्ण कुटूंब रात्रंदिवस मेहनत घेते. मार्च-एप्रिलमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या मुर्तींची नोंदणी सुरू होते. मात्र यावर्षी मार्चमध्ये देशभर करोनाचे संक्रमण सुरू झाल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे मोठ्या मुर्तींच्या मागणीत घट झाल्याने बहुतेक मुर्तीकारांनी लहान आकाराच्या घरगुती मुर्ती बनविण्यावरच भर दिला आहे.

शहरात स्थानिक मुर्तीकारांसह पेण, पुणे, नंदुरबार, नगर आदी भागातूनही श्रीमुर्ती मागविल्या जातात. याशिवाय परप्रांतीय कारागीरही शहरात दाखल होतात. यंदा करोनामुळे परप्रांतीय कारागीर आलेले नाहीत आणि बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात श्रीमुर्ती विक्रीस येण्याची शक्यता कमी असल्याने स्थानिक मुर्तीकारांच्या श्रीमुर्तींना प्राधान्य मिळण्याची शक्यता असल्याचा छोटेखानी दिलासा मात्र मिळाला असल्याची प्रतिक्रिया बोरसे यांनी व्यक्त केली.

श्रीमुर्ती सजावटीसाठीचे साहित्य चीनहून मागविले जात होते. यावर्षी गलवान खोर्‍यात चिनी सैनिकांनी धोकेबाजीने २० भारतीय जवानांचा बळी घेतल्याने चिनी साहित्यावर बहिष्काराचा निर्णय मुर्तीकारांनी देखील घेतला आहे. त्यामुळे सजावटीसाठी भारतीय साहित्याचा वापर करावा लागत आहे.

शिवाय लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदी असल्याने मुर्ती रंगविण्यासाठी आवश्यक रंग उपलब्ध होत नसल्याने अव्वाच्या सव्वा किंमतीत स्थानिक पातळीवर रंग खरेदी करावे लागत आहेत. त्यामुळे मुर्ती निर्मिती खर्चात २५ टक्के वाढ झाली असल्याचेही बोरसे यांनी शेवटी बोलतांना सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com