ध्वजसंहितेचे पालन करत 'घरोघरी तिरंगा' मोहीम यशस्वी करा : जिल्हाधिकारी

ध्वजसंहितेचे पालन करत 'घरोघरी तिरंगा' मोहीम यशस्वी करा : जिल्हाधिकारी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Swatantryacha Amrut Mahotsav) वर्षात येणारा 15 ऑगस्ट हा ‘स्वातंत्र्य दिन’ (Independence Day) आपण सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करावा. तसेच ध्वजसंहितेचे पालन करून जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ ही मोहीम यशस्वीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Gangatharan D.) यांनी यावेळी संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या आहेत....

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector Office) मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. बोलत होते.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी तथा ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे नोडल अधिकारी नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकरी निलेश श्रींगी, गणेश मिसाळ, प्रभारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. एम.व्ही. कदम, नगरविकास विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी किरण देशमुख प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच इतर अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबवित असतांना ध्वज संहितेचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तसेच घरावर उंच ठिकाणी तिरंगा फडकवतांना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत त्यांना सूचना देण्यात याव्यात. तसेच तालुक्यातील सर्व शाळांमध्ये 10 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता एकाच दिवशी एकाच वेळी प्रभात फेरीचे आयोजन करावे. त्याचप्रमाणे 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेवून शाळांमध्ये वत्कृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करावे.

त्यानंतर दुपारी 2 ते 4 या वेळेत स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेल्या सैनिकांचे योगादान, स्वातंत्र्य संग्रामातील महत्वपूर्ण घटना, थोर क्रांतीवीर या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करून यात सर्व शिक्षकांनी सहभाग घ्यावा.

यानंतर दुपारी 4 वाजता बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन करून या स्पर्धामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, बक्षिस देण्यात यावे. तसेच या स्पर्धामध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरव करण्यात यावा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Gangatharan D.) यांनी यावेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ते पुढे म्हणाले की, ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुरेशा प्रमाणात झेंडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याअनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय व खाजगी वितरकांकडे झेंडे (Flag) वितरीत करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात यावे.

तसेच 12 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी सर्व तहसील कार्यालयांनी आपल्या तालुक्यातील स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित घटना, थोर व्यक्ती, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणारे स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे वारस यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी व भावी पिढीला त्यांच्या योगदानाची जाणीव करून देण्यासाठी त्‍यांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करावे.

तसेच स्वातंत्र्य संग्राम लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची छायाचित्रासह माहिती असणारे फलक त्यांच्या निवासा बाहेर किंवा गाव, तालुका तसेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात यावे.

जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी सर्व तहसील कार्यालयांना 5 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या निधीतून 10 टक्के निधी (Fund) हा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आयोजित कार्यक्रमांसाठी राखीव असणार आहे.

तसेच उर्वरीत निधीतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हेरिटेज वॉक किंवा इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावेत.

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी विद्यार्थ्यांचा सहभाग घेवून शहरात तसेच गावागावात अंगणात रांगोळी काढण्यासाठी, आपल्या दारावर तोरण लावण्यासाठी शालेय स्तरावर सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Gangatharan D.) यांनी सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com