नाशिक । प्रतिनिधी Nashik

उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन विकासाच्या संधी लक्षात घेवून याभागात इको टुरिझमसाठी सुक्ष्म नियोजनासोबतच शिर्डी, तोरणमाळ, सारंगखेडा या स्थळांच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने उत्तर महाराष्ट्राचा पर्यटन आराखडा तयार करावा; नाशिक जिल्ह्याला १५१ वर्षे पूर्ण झाली आहेत त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने पूर्वनियोजित कार्यक्रम राबविण्याच्या सूचना आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

आज नाशिक येथे एमटीडीसीच्या ग्रेप सिटी रिसॉर्ट येथे उत्तर महाराष्ट्र व नाशिक जिल्ह्यातील पर्यटन विषयक झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदिश चव्हाण आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, नाशिक बोट क्लब सुरू झाला ही उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचा टप्पा असून बोटींबाबत विशेष दक्षता घ्या. येथिल सारंगखेडा येथे नेलेल्या बोटी पुन्हा आणल्या आहेत. त्या आता नियमित कार्यान्वित ठेवण्याबरोबरच बोट क्लब वर सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे, त्यादृष्टीने कार्यवाही करावी. कोरोना मुळे लोकं वैतागली आहेत, त्यांना विरंगुळा बोट क्लब चा आनंद घेवू द्या तेथे सोयी सुविधा पूर्ण करा मात्र सुरक्षा व्यवस्था परिपूर्ण ठेवण्याचा पुनरूच्चारही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी केला.

नर्सरीसाठी जिल्ह्यात स्कोप आहे; नर्सरी चालकांची मदत घेऊन कामे सुरू करा. पर्यटनस्थळ निसर्गरम्य वाटलं पाहिजे जेणेकरून लोकांना तेथे आकर्षित करत येईल. वीज वाचवण्यासाठी सोलर ची व्यवस्था करावी, एलईडी चा वापर वाढवावा, असेही यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

नाशिकचे १५१वे वर्ष पूर्ण होणार

नाशिक जिल्ह्यास १५० वर्षे पूर्ण होवून जिल्ह्याने १५१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाने त्यासाठी एक वर्षभरापूर्वी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे, कोरोना मुळे त्या कार्यक्रमांना थोडे बाजूला ठेवावे लागले आहे. येणाऱ्या काळात हे कार्यक्रम पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री . पवार यांनी केल्या आहेत.