मनपा निवडणुकीत महामहाविकास आघाडी अगोदर की नंतर?

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यातील महापालिका निवडणुकांना महाविकास आघाडी समोरे जाणार आहे. त्या त्या महापालिकांत महाविकास आघाडीची पक्षांची ताकद वेगवेगळी आहे. यामुळेच आता महाविकास आघाडीतील पक्षांनी एकला चलो रे ची हाक दिली असुन आम्ही निवडणुकीनंतर एकत्र येऊ असे सांगितले आहे.

अशीच स्थिती नाशिक महापालिका क्षेत्रात असुन सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळाची तयारी केली आहे. या स्वबळाचा फायदा नेमका कोणाला होणार? यावर आता चर्चा सुरू आह. त्यामुळे मनपा निवडणुकीत महाविकास आघाडी अगोदर कि निकालानंतर याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

नाशिक मनपा निवडणुकीच्या निमित्ताने सन 2019 च्या निवडणुकीतील घडामोडींना उजाळा देत एकमेकांना डिवचण्याचा प्रकार बैठकांच्या निमित्ताने पुढे येऊ लागला आहे. गत महापालिका निवडणुकीत सर्वच राजकिय पक्ष स्वबळावर लढल्यानंतर भाजपने 66 जागा जिंकत महापालिकेवर झेंडा फडकाविला होता. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केल्याचा मोठा फायदा भाजपला झाला.

यावेळी शिवसेना दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला जाऊन त्यांनी 35 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस यांना प्रत्येक 6 – 6 जागा मिळाल्या होत्या. तर सन 2012 च्या निवडणुकीत सत्तेवर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ 5 जागा मिळाल्या होत्या. तसेच अपक्ष 3 आणि आरपीआय (आठवले गट) यांना 1 अशा जागाची विभागणी 2019 च्या महापालिका निवडणुकीत झाली होती. आता मात्र राज्यात सत्तेत महाविकास आघाडी आहे. याचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

नाशिक शहरात मनपात दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष शिवसेनेकडुन पुढचा महापौर सेनेचाच असे जाहीर करण्यात आले असुन याद़ृष्टीने सेनेच्या नेत्यांनी काम सुरु केले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांची ताकद गेल्या काही वर्षात कमी झाली असल्याचे गत मनपा निवडणुकीतून समोर आले आहे.

या दोन्ही पक्षांना गत निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर आपली शक्ती दोन आकड्यापर्यंत नेता आलेली नव्हती. अशीच अवस्था आरपीआय पक्षांची झाली होती. असे वास्तव असतांना नाशिक शहरात महापालिका निवडणुका महाविकास आघाडी करुन लढणे हिताचे असल्याचे मत काही नेते व्यक्त करीत आहे. जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याचे ठरले तर जागा वाटपाचा मोठा जटील प्रश्न नेत्यांसमोर राहणार आहे.

आघाडीतील पक्षांकडुन स्वबळावर निवडणूक लढल्यास याचा मोठा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपत दुसर्‍या पक्षांतून आलेली मंडळी आपल्या पक्षात परतली तर याचा मोठा तोटा भाजपला होण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक शहरात प्रत्येक विभागात प्रत्येक पक्षांची स्वतंत्र ताकद असल्याने महाविकास आघाडीतील पक्षांत मैत्रीपूर्ण लढत झाल्यास त्या त्या पक्षांची ताकद समोर येईल.

निकालानंतर पुन्हा महाविकास आघाडीतील पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील. असे अनेक मत प्रवाह स्थानिक महाविकास आघाडीच्या नेत्यात आहे. राजकारणातील शक्यता त्या त्या वेळेस समोर येत असल्याने यावर आता केवळ चर्चा करणे शक्य आहे.

महाआघाडीच्या नव्या पॅटर्नला पसंती?

राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या आशा अपेक्षा वाढल्या आहे. शिक्षक – पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मिळालेले यश पाहता महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीकडुन हाच पॅटर्न राबविण्याचे संकेत दिले जात आहे. आता मात्र महाविकास आघाडीकडुन स्वबळाची तयारी केली जात आहे. असे असले तरी राजकारणात ऐनवेळी काही घडू शकते हे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले आहे. हा नवा पॅटर्नची शक्यता अधिक मानली जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *