
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
कसबा पोटनिवडणुकीत मिळालेला विजय आणि चिंचवडमध्ये मिळालेली समाधानकारक मते यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने( Mahavikas Aaghadi) संयुक्त सभांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढण्याचा निर्णय घेतला अशी. बुधवारी झालेल्या महविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत येत्या एप्रिल आणि मे या दोन महिन्याच्या कालावधीत या संयुक्त सभा घेण्याचे एकमताने ठरवण्यात आले.
कसबा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने भाजपच्या ताब्यातून खेचून मोठ्या फरकाने जिंकला. तर चिंचवडची जागा शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे थडक्यात गेली. तरीही तेथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराने समाधानकारक मते घेतल्यामुळे आघाडी म्हणून एकदिलाने लढल्यास भाजप-शिवसेना युतीला मात देता येईल, असा विश्वास आघाडीला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रभर वातावरणनिर्मिती करण्यासाठी आघाडीने संयुक्त सभा घेऊन कार्यकर्ते तसेच जनतेमध्ये राज्य सरकार विशेषतः भाजपच्या विरोधात असलेला असंतोष संघटित करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
यासंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काल विधानभवनात महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला माजी मंत्री सुभाष देसाई, आमदार आदित्य ठाकरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, कॉंग्रेसचे सुनील केदार, सतेज पाटील आणि महाविकास आघाडीतील अन्य आमदार उपस्थित होते. आगामी काळात शिंदे -फडणवीस सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने आणखी आक्रमक भूमिका घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील पक्षांच्या संयुक्त सभा घेण्यात आल्या पाहिजेत असे आवाहन मागील बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केले होते. आजच्या बैठकीत त्यावर चर्चा होऊन एकमत झाले. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभांचा कार्यक्रम आणि नियोजनासंदर्भात येत्या १५ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची बैठक होणार आहे. त्या बैठकीला उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरातून होणार शुभारंभ
दरम्यान, आघाडीच्या संयुक्त सभांचा शुभारंभ २ एप्रिलपासून छत्रपती संभाजीनगर येथून केला जाणार असून या सभेला उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे मार्गदर्शन करणार असल्याचे समजते. त्यानंतर १६ एप्रिल रोजी नागपूर, १ मे रोजी मुंबई, १४ मे रोजी पुणे, २८ मे रोजी कोल्हापूर, ३ जून रोजी नाशिक आणि नंतर अमरावती येथे संयुक्त सभा घेतली जाणार आहेत.