
मुंबई । प्रतिनिधी Mumbai
छत्रपती संभाजीनगरची पहिली सभा यशस्वी झाल्यानंतर आज, रविवारी नागपूर येथील दर्शन कॉलनी मैदानावर आघाडीची दुसरी वज्रमूठ सभा होत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजप विरोधी पक्षांची मोट बांधली जात असताना राज्यात आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षात स्वातंत्र्यवीर सावरकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी आणि अदानी समूहाची चौकशी या मुद्द्यांवर अंतर्गत मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही हे मतभेद बाजूला ठेवून आघाडीचे ऐक्य अबाधित असल्याचा संदेश आजच्या सभेतून दिला जाणार आहे.
२ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरला झालेल्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. त्यांच्या सभेतील गैरहजेरीचा विषय आघाडीसाठी चिंतेचा होता. मात्र, आजच्या सभेला पटोले उपस्थित राहणार आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीकाही दिवसांपूर्वी पटोले यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता. आघाडीचे विषय संबंधित नेत्यांकडे मांडण्याऐवजी ते माध्यमांसमोर मांडले जात असल्याबद्दल पवार यांनी पटोले यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. याविषयी आपण नागपूरच्या सभेत बोलणार असल्याचे पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे आजच्या सभेत अजित पवार यांच्या भाषणाविषयी उत्सुकता आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत बसण्यासाठी वेगळी खुर्ची देण्यात आली होती. तसेच सभेच्या व्यासपीठावर त्यांच्या आगमनाप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती, यावरूनही आघाडीत नाराजी नाट्य रंगले होते. त्यामुळे आजच्या सभेत आघाडीच्या सर्व नेत्यांसाठी एक सारख्या खुर्च्या राहतील, असे सांगण्यात येते.
दरम्यान, माजी मंत्री आणि काँग्रेसचे नागपूर जिल्ह्यातील नेते सुनील केदार हे आजच्या वज्रमूठ सभेचे समन्वयक असले तरी सभा यशस्वी होण्यासाठी तीनही पक्षांनी जोर लावला आहे. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.
संजय राऊत नागपुरात दाखल
दरम्यान, सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप आणिकेंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शहा यांना जोरदार टोला लगावला.अमित शहा हे मुंबईतून नागपूरची सभा पाहतील, असे राऊत म्हणाले. शिवाय नागपूर हा भाजपचा गड वगैरे काही नाही. असे अनेक गड तुटून पडले आहेत. त्याचा प्रत्यय तुम्हाला रविवारी येईल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.