Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात लॉकडाऊनसाठी कोणत्या नियमांचा विचार सुरू? जाणून घ्या...

राज्यात लॉकडाऊनसाठी कोणत्या नियमांचा विचार सुरू? जाणून घ्या…

मुंबई

लॉकडाऊनचे नियम शिथिल होऊन काही महिने उलटत नाहीत तोपर्यंत सामान्य जनतेवर पुन्हा लॉकडॉऊनची टांगती तलवार आहे. येत्या शुक्रवारी (२ एप्रिल) त्यासाठी नवीन नियमावली येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत लॉकडाऊन-२ जाहीर करणार आहे. हे लॉकडाऊन मागील लॉकडाऊनहून वेगळा असणार आहे.

- Advertisement -

मागील वर्षी म्हणजेच २५ मार्च २०२० रोजी देशात पहिला लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनच्या वर्षानंतरही अजूनही कोरोनाचे थैमान सुरुच आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात मोठया संख्येने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. देशातील सर्वाधिक १० कोरोनाग्रस्त जिल्ह्यतील आठ जिल्हे महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची बैठक दोन दिवसापूर्वी पार पडली. या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्णयाबाबतही चर्चा झाली. या लॉकडाऊनचे स्वरुप ५० टक्के लॉकडाऊन आणि ५० टक्के निर्बंध असे असणार आहे.

लॉकडाऊन झाला तर नियम काय असतील?

कोरोनासोबतच लॉकडाऊन या शब्दानेही डोके वर काढले आहे. भाजप, मनसे व सत्ताधारी राष्ट्रवादीचाही लॉकडाऊनला विरोध आहे. पण जर २ एप्रिलला लॉकडाऊन लागलाच तर तो आधीच्या लॉकडाऊनहून वेगळा असणार आहे. पुर्वीच्या लॉकडाऊनमध्ये सगळ्याच गोष्टी बंद करण्याचे आदेश होते. तर या लॉकडाऊनमध्ये फक्त गर्दीची ठिकाणे बंद केली जातील. म्हणजेच शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, गार्डन्स, नाट्यगृह बंद असतील.

मागील लॉकडाऊन २४ बाय ७ सगळे बंद ठेवण्याचे आदेश होते. मात्र, आताच्या लॉकडाऊनला विशिष्ट वेळ दिली जाण्याची शक्यता आहे. ती वेळ कदाचित सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंतची असेल. सध्या अनेक शहरात रात्रीची संचारबंदी आहे. त्यात धर्तीवर दिवसा संचारबंदी लावण्याची तयारी प्रशासन करत आहे. शिवाय हा लॉकडाऊन अगदी ५ किंवा ७ दिवसांचा असेल. जास्त मोठा लॉकडाऊन होणार नाही.

प्रवास सुरु राहणार का?

मागील लॉकडाऊनमध्ये जिथे आहात तिथेच थांबण्याचे आदेश होते. बस, रेल्वे, विमान व खाजगी वाहतूक बंद होती. मात्र यावेळी काही वेगळा प्रकार असणार आहे. यात प्रवासबंदी नसणार आहे. मात्र रेल्वेस्टेशन्स, विमानतळे, बसस्थानके इथे कोरोना चाचण्या करण्याचेही धोरण सरकारने ठरवले आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन कोरोना रुग्णांना वेगळे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच लसीकरणाचीही गती वाढवून निवडणुकांच्या धर्तीवर लसीकरण केले जाणार आहे. लोकांना लसीकरण बूथपर्यंत आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून स्वयंसेवकांना नेमण्याचाही विचार सरकार करत आहे.सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध आणणे किंवा ती बंद करणे हा शेवटचा पर्याय असेल. कारण वाहतूक बंद केल्यास त्याचा थेट फटका अर्थव्यवथेला बसणार आहे.

भाजीपाला किराणाचे काय होणार

मागील लॉकडाऊनमध्ये भाजीपाला किराणा बंद होता. यावेळेस मात्र तसे असणार नाही. किराणा भाजीपाला ठराविक वेळेत सुरु असणार आहे.

विरोध पक्ष असलेला भाजप व मनसेचा लॉकडाऊन विरोध आहे. पण महाविकास आघाडीतील पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचाही त्याला विरोध आहे. राष्टवादी काँग्रेसमध्ये यासाठी एकवाक्यता नाही. राष्टवादी नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणे हा पर्याय नव्हे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळे अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकतो. यामुळे लॉकडाऊनबाबत राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका याबाबत दिसत आहे.

लॉकडाऊनवर हा शेवटचा पर्याय- टोपे

पटेल यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे सरकारमधील मंत्री राजेश टोपे यांची वेगळी भूमिका आहे. ते म्हणतात, ‘लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, याची चिंता राज्य सरकारला आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी जे करणे गरजेचे आहे ते सगळे राज्य सरकार करत आहे. संसाधनांची कमी पडू दिली जात नाही. कोरोना संख्येच्या वाढत्या गतीपुढे आपली संसाधने कमी पडतील अशी मला शंका वाटते आहे. लॉकडाऊनची कोणालाही हौस नाही. पण आपली संसाधने जर वाढत्या रुग्णांच्या पुढे कमी पडत असतील तर लॉकडाऊन करावा लागतो.’

नवाब मलिकांचाही विरोध

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही लॉकडाऊनला विरोध केला होता. ते म्हणतात, ‘लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार आहोत.’

मनसे विरोधात

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही लॉकडाऊनला विरोध केला. ते म्हणाले, ‘लॉकडाऊन केल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होते असे शास्त्रीसदृषट्या सिद्ध झालेले नाही, तसे काही असेल तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगावे. गेल्या वर्षी लॉकडाऊन करण्यात आले. त्यावेळेस राज्य सरकार आणि सर्वसामान्यांना या संदर्भात कोणतीच माहिती नव्हती. मात्र गेल्या वर्षभरात कोरोनावर कोणते वैद्यकीय उपचार करावे लागतात, त्याच्यासाठी लागणारी संसाधने उपलब्ध आहेत, लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का?’ असा सवालही देशपांडे यांनी विचारला आहे.

भाजपही विरोधात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आपला लॉकडाऊनला कडाडून विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनासाठी चाचण्या वाढवा, काळजी घ्या पण आता लोकांनी घरी बसावे ही भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या