
नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra power struggle )सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court )सुरू असतानाच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याने संघर्ष वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षावरची सुनावणी उद्यापासून (दि.21) सलग तीन दिवस होणार आहे.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढेच ही सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात घटनापीठासमोर सलग तीन दिवस सुनावणी सुरु होती. आतादेखील पुढची सुनावणी सलग तीन दिवस होणार आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह सत्ताधारी शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर ठाकरे गटाने तीव्र आक्षेप नोंदवला असून आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. ही याचिका उद्याच दाखल केली जाण्याची चिन्हे आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दृष्टीने आता पुढील तीन दिवस महत्त्वाचे असून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे.